हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 29 जुलै : जागतिक व्याघ्र दिनीच चंद्रपूरमध्ये दुःखद घटना घडली आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बल्लारपूर-गोंडपिंपरी मार्गावरील कळमना येथे ही घटना घडली आहे. आज दुपारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपात वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आहे. मृत्यू झालेली वाघीण अंदाजे 4 वर्षांची असून रात्रीच्या दरम्यान वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत. वाघिणीचा मृतदेह विच्छेदनासाठी चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात आणला गेला आहे. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर वाघांची संख्या आहे, त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रातील या शहरात आहेत सर्वाधिक वाघ, SPECIAL REPORT महाराष्ट्रात किती वाघ? देशभरातील व्याघ्र प्रकल्पांच्या कामगिरीचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला. यामधील आकडेवारीनुसार देशात वाघांची संख्या 3 हजार 167 वर पोहचली आहे. तर 2022 च्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रातली किमान वाघांची संख्या 390 आहे. व्याघ्रगणनेच्या अनुमनानुसार ही संख्या 466 च्या पुढे आहे. त्यात एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 87 ते 91 वाघ असल्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.