पिंपरी-चिंचवड, 10 डिसेंबर : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी कार्यक्रम करणार आहे, मी चळवळीतला माणूस आहे, कुणालाही घाबरत नाही. तीन वेळा स्पष्टीकरण दिलं, दिलगिरी व्यक्त केली, हा भ्याडपणा आहे. हिंमत असेल तर समोरून या. महाराष्ट्रात ही झुंडशाही चालली आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र सहन करणार नाही. याचं सगळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघतील’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, भाजपचा हल्लेखोरांना इशारा#ChandrakantPatil #BJP pic.twitter.com/0b15Yq3pky
— News18Lokmat (@News18lokmat) December 10, 2022
‘आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली सूट दिली असती तर केवढ्याला पडलं असतं. ही आमची संस्कृती नाही. शब्दांना शब्दांनी टक्कर देता येते’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘विरोधकांनो कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा…’, चंद्रकांत पाटलांच्या शाईफेकीनंतर भाजपचा इशारा गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत येणं सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाहीये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसंच कोणत्याही पोलिसावर कारवाई करू नका, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. या हल्ल्याविरोधात भाजप आंदोलन करणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सांगतील ते करावं, घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.