मुंबई, 26 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुढील काळात इयत्ता पहिली ते नववीपर्यंत परीक्षा घेण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यात मागील दोन दिवसांमध्ये वाशिम आणि सोलापूर येथे निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर राज्यात शालेय शिक्षण संस्था चालक, शिक्षक, विद्यार्थी-पालक यांच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यात सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये देखील रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासनाने शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘न्यूज18 लोकमत’ला मुलाखत देताना सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या ठिकाणी स्थानिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्हाधिकारी यांनी शिक्षण संस्थाचालक यांच्याशी समन्वय साधून शाळा चालू ठेवायच्या की बंद करायचा या संदर्भात निर्णय घ्यावा. वाशिम आणि सोलापूर येथे निवासी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना लागण झाल्याने यासंदर्भात देखील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला. याबाबतीत समाज कल्याण आणि आदिवासी विभागाला सूचना केल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितले. हेही वाचा - राज्यांतील कोरोनाचा प्रकोप पाहता केंद्रानं घेतला आणखी एक निर्णय; नवा आदेश जारी राज्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत राहिली तर शालेय स्तरावरील इयत्ता पहिली ते नववीपर्यंत परीक्षा घ्यायच्या की नाही याचा देखील निर्णय पुढील काही दिवसात घेण्यात येईल. इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत मात्र बोर्डाकडून अहवाल मागवण्यात येईल. राज्यात रुग्णांची वाढत राहिली तर याबाबत देखील निर्णय घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.