मुंबई, 25 ऑगस्ट : नितीश कुमार यांनी याच महिन्याच्या सुरूवातीला बिहारमध्ये (Nitish Kumar Bihar) भाजपला (BJP) धक्का दिला. भाजपची साथ सोडत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांची आरजेडी (RJD) आणि काँग्रेससोबत (Congress) महागठबंधन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप प्रादेशिक पक्षांना संपवत असल्याचा आरोप करत नितीश कुमार यांनी त्यांची साथ सोडली.
बिहारमधल्या या सत्तानाट्याला महिना होत नाही तोच भाजपने नितीश कुमार यांच्या जेडीयूचा बदला घेतला आहे. अरुणाचल प्रदेशमधला (Arunachal Pradesh) जेडीयूचा शेवटचा आमदारही भाजपमध्ये गेला आहे. 2019 साली अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत जेडीयूने 15 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. या 15 जागांपैकी 7 जागांवर जेडीयूचे उमेदवार निवडून आले.
अरुणाचल प्रदेशमधल्या जेडीयूच्या 7 पैकी 6 आमदारांनी डिसेंबर 2020 मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता जेडीयूचा शेवटचा आमदार टेची कासो हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
अरुणाचल प्रदेश विधानसभेचं संख्याबळ
अरुणाचल प्रदेश विधानसभेचं संख्याबळ 60 एवढं आहे. यापैकी भाजपकडे आता 49 आमदार आहेत. याशिवाय नॅशनल पिपल्स पार्टीचे 4 आणि 2 अपक्षांचाही भाजप सरकारला पाठिंबा आहे. तर विरोधी पक्षात काँग्रेसचे 4 आणि तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nitish kumar