महाबळेश्वर, 20 जानेवारी : वनसदृश्य क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नीला नोटीस पाठविण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या पत्नीबरोबरच आणखी तीस मिळकतधारकांनाही नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महाबळेश्वर येथील वनसदृश्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. अशा बांधकामामुळे निसर्गाची हानी होत आहे. मात्र अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये बड्या लोकांची नावे आहेत. हरीत लवादाने या प्रकरणात नावं असलेल्यांना नोटीस बजावली आहे. याअंतर्गत त्यांना खुलासा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नोटीसानुसार इकोसेन्सेटिव्ह झोन व वनसदृश्य क्षेत्रात अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने समर्थनीय पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे हरित लवादाकडून नोटीसात नमूद करण्यात आलं आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनाही ही नोटीस पाठविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 10 रुपयांत जेवण या योजनेवर टीका केली होती. राणे म्हणाले, उध्दव ठाकरे जे जेवतात तेच जेवण दहा रुपयात देणार का? मुंबई महापालिकेत फक्त कर्मचाऱ्यांसाठी अशी योजना सुरू केली. त्याला 40 रुपये अनुदान दिलं जातं. म्हणजे 50 रुपयात थाळी पडते. सरकार जे अनुदान देतं ते लोकांनी दिलेल्या टॅक्सच्या पैशातून दिलं जातं. शिवसेनेला यातून भ्रष्टाचार करायचा आहे अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेने भ्रष्टाचाराविषयी बोलूच नये. त्यांची सर्व कुंडली माझ्याकडे आहे असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







