जालना, 30 मार्च : वीज कापल्याने भाजपच्या आमदाराने वीज वितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ करत धमकावल्याचा (BJP MLA threaten to Mahavitaran engineer) प्रकार समोर आला. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल (BJP MLA audio clip viral) होत आहे. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) हे महावितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ आणि धमकी देत असल्याचं बोललं जात आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर आता आमदार बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाले आमदार बबनराव लोणीकर? वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासोबतची एक कॉल रिकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर रिकॉर्डिंग बनावट असून मला बदनाम करण्यासाठी ही बनावट क्लिप विरोधकांकडून व्हायरल केली जात असल्याचं स्पष्टीकरण भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलं आहे. औरंगाबादमध्ये माझे दोन बंगले असून त्याचे मीटर काढून नेल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. वास्तविक पाहता औरंगाबादमध्ये माझा फक्त एकच बंगला असून त्याचा मीटर आहे तसाच आहे. त्यामुळे मी तसं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. यावरून सदर क्लिप बनावट असल्याचं स्पष्ट होते असंही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले. वाचा : शिवसेनेच्या आमदारांबाबत भाजप आमदाराने केला खळबळजनक दावा, महाराष्ट्रात राजकीय भूकंप? हा वीज वितरण कंपनीच्या सक्तीच्या वीजबिल वसुलीला आमचा विरोध असून लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जनहितार्थ आमची ही भूमिका आहे, मात्र आमचे विरोधक आम्हाला बदनाम करत असल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. काय आहे ऑडिओ क्लिप? आमदार बबनराव लोणीकर - बबनराव लोणीकर बोलतोय आमदार. दादासाहेब काळे, इंजिनिअर - नमस्कार साहेब बोला. आमदार बबनराव लोणीकर - तुम्ही मीटर काढून नेलं का माझं? दादासाहेब काळे, इंजिनिअर - नाही , मी कुठं काढून नेलं. आमदार बबनराव लोणीकर - अरे नालायकांनो, आम्ही बिल भरतो. मी 10 लाख रुपये बिल भरलं, औरंगाबादचं. तुमच्या XXXदम आहे का? हिंमत आहे तर तुमच्यात… झोपडपट्टीत जा.. जे लोकं आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे मी 10 लाख रुपये भरले आहेत मी या वर्षात. दादासाहेब काळे, इंजिनिअर - नाही सर, मी दोनदा येऊन गेलो. आमदार बबनराव लोणीकर - एका मिनिटात घरी पाठवेल तुला. माज चढला का, पैसे आम्ही भरतो. ज्यांच्याकडे आकडे आहेत ना त्यांच्याकडे जा हिंमत असेल तर. दादासाहेब काळे, इंजिनिअर - मीटर नाही काढून नेलं. आमदार बबनराव लोणीकर - आमचं मीटर का काढून नेलं, नोटीस दिली का तुम्ही? मी पागल आहे का. मीटर काढून नेलं म्हणून बोलतोय. दादासाहेब काळे, इंजिनिअर - सर तुमच्या बंगल्याचं मीटर आहे तिथेचं आहे. तीन लाखांचं बिल आहे. आमदार बबनराव लोणीकर - तुम्ही मीटर काढून नेलं, मला फोन आला होता आता आमच्या ड्रायव्हरचा. पैसे भरतो ना आम्ही. नोटीस द्या. वीज वितरण कंपनी स्थापन झाली. कायद्यात नियम आहे तुम्हाला नोटीस दिल्याशिवाय असं करत येत नाही. एक फोन केला असता तुम्ही… पैसे भरतो आम्ही, मी जालन्याला तीन लाख रुपये भरले. मी तुम्हाला बोलतो माझी काही जबाबदारी नाही का? अरे राजा, 35 वर्षे झाली मला राजकारणात आहे. आम्ही एक रुपयाची वीज चोरत नाही. जे चोरी करतात त्यांच्या मागे लागण्याची हिंमत आहे का? ते तुम्हाला तोडतील. दादासाहेब काळे, इंजिनिअर - मीटर काढलं नाही, मी कालच येऊन गेलो. आमदार बबनराव लोणीकर - नियमित पैसे मी भरतो. आम्ही कुणाचे पैसे बुडवले नाही. दादासाहेब काळे, इंजिनिअर - सर, दोन वर्षे झाली. मी दोनदा-तिनदा येऊन गेलो. आमदार बबनराव लोणीकर - कसले दोन वर्षे झाले, मी मागच्याच वर्षी साडेचार लाख रुपये भरले आम्ही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.