मुंबई, 21 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्या प्रकरणानंतर महाष्ट्रातील वातावरण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाचं संकट आणि पालघर हत्याकांड या दोन्ही विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली असल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या नेमणुकीविषयी काही चर्चा झाली का, याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की आपण उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या नेमणुकीविषयी सामंजस्याची भूमिका घ्यावी.
संजय काकडे यांनी विनंती करत दिला होता इशारा
'13 दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस केली होती. आता कॅबिनेटने मंजुरी दिलेली असतानाही राज्यपालांनी अद्याप मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद आमदारकीवर का शिक्कामोर्तब केलं नाही, असा सवाल माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केला होता. तसंच याकामी स्वत: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन या पेचप्रसंगातून मार्ग काढावा, अन्यथा महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही, असंही काकडे यांनी भाजप नेतृत्वाला सुनावलं होतं.
राऊतांनीही केली होती टीका
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आक्रमक शब्दांमध्ये अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.