सुनिल दवंगे, अहमदनगर, 9 मे : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं (Religious Places) आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा (Tradition) ही अनोखीच असते. अशीच नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कौठेवाडी या गावातील बिरोबाची यात्रा (Biroba Yatra) कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत असलेली मातीची घागर घेऊन भाविक भक्त बिरोबाच्या मंदिराला फेरा मारतात. अक्षय तृतीयेनंतरच्या रविवारी हा थरार अभुभवयास मिळतो.
यंदा ही यात्रा रविवार 8 मे रोजी रात्री साजरी करण्यात आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या सावटानंतर अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात अकोले तालुक्यातील दुर्गम भागात ही यात्रा पार पडली. महत्त्वाचे म्हणजे यंदा 91 कठे या यात्रेत मिरवण्यात आले आहे.
काय आहे कठा आणि परंपरा?
कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर असते. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपडा करून ठेवतात. खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकड या घागरीत उभी भरतात. त्यात कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने नवीन को-या कपड्याने त्याला घट्ट बांधातात. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट आणि नवस केलेल्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले असते.
विठ्ठल भोईर (कौठेवाडी) येथील पुजारी सांगतात की, ही प्रथापंरा कधी सुरू झाली याची खात्रीलायक माहिती जरी नसली तरी जूने जाणते यांच्या मते हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. तेव्हा काही लोक कौठेवाडी येथे आले आणि येताना आपला दगडरुपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना. तेव्हा हा प्रांत जाहगिरी खाली होता. येथिल जाहगिरदारानं आम्हाला म्हणजे भोईर आणि भांगरे यांना येथे कसण्यास जमीन देवून येथेच स्थायिक होण्यास सांगितले तेव्हापासून आम्ही येथे बिरोबा महाराजांच्या चरणी आहोत.
अंकुश रामजी भांगरे (साकीरवाडी) हे सांगतात की, कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि अख्यायिका आहेत. पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेवून आला होती, तेव्हा त्यांच्यावर आलेल संकट बिरोबाच्या नवसान दूर झाले आणि ते भयमुक्त झाले. तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठ्याची परंपरा सुरू आहे. आज मुंबई, ठाणे सह अनेक जिल्ह्यातून भाविक या यात्रेसाठी येतात. बिरोबाला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर नवसपुर्तीसाठी कठा अर्पण करतात.
नवसाचा कठा श्रद्धा की अंधश्रद्धा -
येथील यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले आणि ओकाणारे धगधगणारे कठे (घागर) डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीगणिक किलो-किलो तेल या ढणढणत्या कठ्यांमध्ये भाविक ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांमधून खाली भक्तांच्या उघड्या अंगावर ओघळत. मात्र, लालबुंद होणाऱ्या कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पुर्तीसाठी कठा तयार केला जातो तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबाचै संचार झालेला असतो, अशी धारणा भाविकांची आहे.
आगीचा थरार आणि बिरोबाची गर्जना
डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल… मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चित्कार करत लोक बिरोबाचा गजर करतात. अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी हा थरार पाहण्यासाठी मोठा जनसुदाय कौठेवाडी गावात रात्री जमा होतो. या निमित्तानं येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते.