ठाणे, 13 जानेवारी : देशभरातील अनेक राज्यात आपले पाय पसरत बर्ड फ्ल्यू या रोगाने महाराष्ट्रातदेखील शिरकाव केला आहे. यामुळे नागरिक चिंतीत झाले आहेत. गेले वर्षभर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे मुळपदावर येत असतानाच या नव्या संकटाने सर्वजण धास्तावले आहेत. राज्यातील अनेक कुक्कुटपालन करणारे व्यावसायिकही चिंतीत असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. ठाण्यात देखील अनेक पक्षी मृत्यमुखी पडले असून याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका देखील सतर्क झाली आहे. ठाणे महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत्यू आढळल्यास नागरिकांनी त्वरित दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केलं आहे. बर्ड फ्ल्यू हा कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात संक्रमित करतो व त्यामुळे माणसे देखील आजारी पडतात. यासाठी ठाण्यात एक व्यापक सर्वे घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील एकूण सहाशे चिकन विक्री दुकानांपैकी आत्तापर्यंत जवळपास चारशे दुकानांचा सर्वे पूर्ण झाला असून सुदैवाने एकाही दुकानात बर्ड फ्ल्यू संक्रमित कोंबडी अद्याप मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.