दिनेश केळुसकर, प्रतिनिधी बेळगाव, 29 ऑगस्ट : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून अटक केलेला सागर सुंदर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात याची व्हॅन वापरात आल्याचा कर्नाटक एसआयटीला संशय आहे. शिवाय लंकेश हत्येनंतर भरत कुरणेच्या फार्म हाउसवर जी पार्टी झाली त्या पार्टीत याचा सहभाग होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीला मिळाली असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भरत कुरणे ज्याचा हा फार्म हाउस आहे तो देखील शिवप्रतिष्ठानचा कडवा कार्यकर्ता आहे. कर्नाटक एसआयटीने बेळगावच्या कॅम्प पोलीस स्टेशनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सागर लाखेच्या फेसबुक वॉलवर भिडे गुरुजींसोबतचे त्याचे खूप फोटो आहेत. त्याचा एक व्हिडिओदेखील आहे. त्यामुळे सागर लाखे शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. पण या सगळ्या बाबत शिवप्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांना विचारलं असता सागर लाखेबद्दल त्यांना काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर भरत कुरणेविषयीही आपल्याला माहिती नसल्याची प्रतिक्रिया नितीन चौगुले यांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे. पण जर हे लोक खरंच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील तर यात त्यांची चौकशी व्हावी आणि यासाठी भिडे गुरुजीही चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सागर लाखे याला बेळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कर्नाटक एसआयटीनं या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. सध्या लाखेला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी सुरू आहे. सागर लाखे हा बेळगावच्या गणेशपूर भागात राहतो. कोण आहे सागर सुंदर लाखे ? - शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता - वय वर्षे 30 - माजी ग्रामपंचायत सदस्य - बेंकनहळ्ळी ग्रामपंचायत - कराटे चॅम्पियन - फुलांची नर्सरी चालवतो गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. या आरोपींच्या चौकशीत वारंवार सागर लाखेचं नाव समोर येत होतं. त्यामुळे सागरचा शोध घेत मध्यरात्री एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे या सगळ्यात आता काय मोठा खुलासा होतो याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तानने आशियाई खेळात किती पदकं मिळवली माहीत आहे का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.