भिंवडी, 1 जून : ब्रेक फेल झालेली रिक्षा पाण्याने भरलेल्या 20 फूट खड्ड्यामध्ये गेल्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना भिंवडीमध्ये घडली आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. मुंबई-नाशिक हायवेवर पिंपळघर भागात असलेल्या भूमी वर्ल्ड समोर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मुन्नी देवी चव्हाण (वय 32), राधा चव्हाण (वय 33) आणि मुलगी अंशिका चव्हाण (वय 2) यांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा चालक राकेश चव्हाण (वय 34), रवी चव्हाण (वय 11), अंजली चव्हाण ( वय 9), अंकिता चव्हाण (वय 7) हे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील हे सगळे जण टिटवाळा जवळच्या बनेली गावात राहतात. राकेश चव्हाण याची मेहुणी उत्तर प्रदेशहून बहिणीच्या घरी राहायला आली होती. मेहुणीला मुंबई फिरवण्यासाठी राकेश चव्हाण कुटुंबासह जुहू चौपाटीवर गेला. रिक्षामध्ये राकेश त्याची मृत पत्नी आणि चार मुलं होती. मुंबईहून घरी टिटवाळ्याला जात असताना मुंबई-नाशिक हायवेवर भूमी वर्ल्ड जवळ रिक्षेचा ब्रेक फेल झाला आणि रिक्षा खांबाला जाऊन आदळली, यानंतर बाजूलाच असलेल्या 20 फूट खोल पाण्याच्या खड्ड्यात रिक्षा बुडाली. रिक्षा पाण्यात बुडल्यानंतर राकेशने मदतीसाठी आरडाओरडा केला, पण तब्बल एका तासानंतर त्याला मदत मिळाली. तिकडेच असलेला भंगारवाला आणि हॉटेलमध्ये काम करणारी माणसं तिकडे पोहोचली. यातल्या एकाने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली पण तोदेखील गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्याचं कळल्यानंतर आसपासच्या लोकांनी दोरी टाकून चव्हाण कुटुंबाला बाहेर काढलं. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिकडे डॉक्टरांनी राकेशची पत्नी मुन्नीदेवी, मेहुणी राधा आणि छोटी मुलगी अंशिका यांना मृत घोषित केलं. राकेशसह त्याचा मुलगा रवी, मुलगी अंकिता आणि अंजली यांच्यावर उपचार सुरू आहेत. चव्हाण कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्यात उतलेले तीन जणही जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. भूमी वर्ल्ड जवळ असलेला जुना नाला खोदून तिकडे नाल्याचं रुंदीकरण सुरू आहे. पण तिकडे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेट्स किंवा पत्रे किंवा दिवेही लावले नव्हते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







