भिवंडी, 14 जुलै : भिवंडी तालुक्यातील कशेळी खाडी पुलावरून 27 वर्षीय युवकाने उडी मारून आत्महत्या केली आहे. नारपोली पोलिसांनी ठाणे अग्निशामक दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. राहुल संदीप जोशी रा.बांगर नगर,काल्हेर असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. राहुल हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा युवक सध्या काम बंद असल्याने घरी होता. मागील एक महिन्यांपासून शीघ्रकोपी स्वभाव असल्याने तो मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेत असल्याची माहिती राहुलची बहीण नेशा जोशी यांनी दिली आहे. नुकत्याच त्याच्या गोळ्या संपल्या असल्याने तो रागात घरातून बाईक घेऊन कशेळी येथे मित्र समीर याच्या घरी गेला होता. त्या दरम्यान वडिलांनी संपर्क साधला असता त्याने घरी येणार नाही, असे सांगितल्याने वडील घरी निघून आले. मी कुठे आहे हे कुटुंबाला समजल्याचा राग आल्याने राहुलने मोबाईल आपटल्याचं त्याचा मित्र समीर घरी येऊन सांगितलं. त्यानंतर राहुलचे वडील हे कामासाठी ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना खाडीपुलावर गर्दी व त्या ठिकाणी आपल्या मुलाची बाईक आढळून आली. तसंच नागरीकांनी माहिती दिल्यावर ही घटना कुटुंबियांना समजली. तेथील नागरिकांसह ठाणे अग्निशामक दलाच्या जवानांनी खाडी पत्रात राहुलचा शोध घेतला असता तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहिम थांबवण्यात आली आहे. दरम्यान नारपोली पोलिसांनी त्याच्या बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.