रायगड, 29 मार्च : विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना आमदार शंभुराज देसाई यांनी भरत गोगावले यांना पुडी दिली. या पुडीमधून भरत गोगावले यांनी काहीतरी खाल्लं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शंभुराज देसाई यांनी गोगावले यांना तंबाखूची पुडी दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण आता यावर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्हाला कोणतंही व्यसन नाही, केवळ मुखशुद्धीसाठी शंभुराजे यांच्याकडून इलायची घेतल्याचे गोगावले यांनी सांगितले. विरोधक त्यांचे काम करत राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनाच माहिती आहे. आम्ही कोणतेच व्यसन करत नाही त्यामुळे तंबाखूचा प्रश्न येत नाही, असं स्पष्टीकरण गोगावले यांनी महाडमध्ये पत्रकारांसोबत बोलताना दिले.
दरम्यान अधिवेशनावेळीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शंभुराज देसाई यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. मला कोणतंही व्यसन नाही. घसा कोरडा पडला तर मी इलायची पावडर खातो. इलायची पावडर माझ्याकडे नेहमीच असते, असं शंभुराज देसाई म्हणाले होते. आदित्य ठाकरेंची टीका ‘हा निंदनीय प्रकार आहे, सभागृहाची जी प्रथा परंपरा आहे, कायदे-कानून आहेत त्याचं पालन होत नाही. टीव्हीवर जे दृष्य दिसलं आहे, तसे जर राज्यकर्ते वागायला लागले, तर हे कसले आदर्श राज्यकर्ते? याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि सभागृहात कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. शंभुराज देसाईंचा पलटवार ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युवा नेते सभागृहात बोलले का? तुम्ही मदत द्या, असं बोलले का? कधी बांधावर गेले का? एवढी अतिवृष्टी झाली, महापूर आला, गारपीट झाली. एका बांधावर गेलेले हे युवानेते अधिवेशन काळात कधी दिसले नाहीत. विरोधी पक्ष सभागृहात एवढे विषय मांडतात, त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचेच नेते दिसतात. ठाकरेंचा जो छोटासा गट आहे तो आणि युवानेते कधी सभागृहात बोलत नाहीत. राज्याच्या हिताच्या विषयावर बोलायचं नाही,’ असा पलटवार शंभुराज देसाई यांनी केला.

)







