बीड, 12 ऑगस्ट : पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी निश्चितच प्रगती साधू शकतो. राज्यातील प्रथमच चार प्रकारच्या मिश्रफळ शेतीचा यशस्वी प्रयोग महिला शेतकरी विजया गंगाधर घुले (farmer Vijaya Ghule) यांनी केळसांगवी सारख्या छोट्याशा खेडेगावात यशस्वी करून दाखवला आहे. बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागात आधुनिक शेतीची (Agriculture) कास धरल्यामुळे परिसरातील शेतकरी देखील आता या प्रगतशील शेतीला भेटी देऊ लागले आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे आपला मोर्चा वळवत आहेत. विजया यांनी प्रगतशील शेती करत फक्त वर्षाकाठी 5 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न हाती घेतले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केळसांगवी तसा दुष्काळग्रस्त भाग आहे. अशी ठिकाणी मेक्सिको या देशात फुलणारी ड्रॅगन फ्रूटची फळबाग फुलवली आहे. विजया यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त परगावी असतात. शेतीची संपूर्ण जबाबदारी विजयात सांभाळतात. एकट्या महिलेवर संपूर्ण शेतीची जबाबदारी असून देखील विजया यांनी शेतीत प्रयोग केले. त्यांनी 2 एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट, खजूर, सफरचंद आणि पेरू या चार प्रकारची मिश्र फळबागांची लागवड केली. विजया यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यातून वर्षाकाठी 5 ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
12 बाय 8 फूट अंतरावर लागवड
2016 मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. या फळबागेची लागवड 12 बाय 8 फूट अंतरावर केली. ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून चांगला नफा मिळू लागला आहे. दोन्ही ओळीतील अंतर 12 फुटाचे असून या 12 फुटाच्या अंतरामध्ये पेरू, खजूर आणि सफरचंदाची लागवड केली. चार प्रकारच्या बागेतून अधिक उत्पन्न हाती येत आहे.
दोन एकरात एकूण 800 रोपे
विजया घुले यांनी ड्रॅगन फ्रूटच्या दोन एकरात एकूण 800 रोपे लावली आहेत. यापैकी रेड व्हाईट 500 रोपे, रेड-200 रोपे, यलो- 100 रोपांचा समावेश आहे. पहिल्या तोडणीपासून अर्ध्या एकरात 4 ते 5 टनांचे उत्पादन निघून साधारण 5 ते 7 लाखापर्यंतचे उत्पन्न हाती आले आहे.
एक झाड 3750 रुपये
बऱ्हई जातीचे 80 खजुराचे झाडे लावली असून चौथ्या वर्षापासून खजुराच्या उत्पादनास सुरुवात होईल. सदरील एक झाड 3750 रुपये या दराने गुजरात येथून खरेदी केले आहे. लागवडीच्या खर्चासह प्रति झाड 5 हजार रुपये असा खर्च आला आहे. खजुराच्या एका झाडापासून 150 ते 200 किलो खजूर मिळेल. तसेच दोन खजुराच्या झाडांमध्ये एका सफरचंदाच्या झाडाची लागवड केलेली आहे. अशा प्रकारे सफरचंदाची 240 झाडे लावलेली आहेत. सफरचंदापासून दुसऱ्या वर्षी उत्पादनास सुरुवात होईल. प्रति झाड 50 किलोपर्यंत आठ वर्षानंतर उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
मेहनतीच्या जोरावर मुलांचे शिक्षण पूर्ण केले
विजया घुले (संपर्क क्रमांक- 91 97634 34430) यांनी बोलताना सांगितले की शेतीच्या उत्पन्नातून मेहनतीच्या जोरावर आपल्या दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. आता दोन एकर क्षेत्रामधून कमीत कमी 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न मिळवायचेच आहे असा निश्चय केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.