बीड, 15 सप्टेंबर : गेल्या तीन वर्षांत अल्पवयीन मुलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यात मुलींचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती, नैराश्य, व्यसन, प्रेमभंग या कारणांमुळे मुलं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत 131 मुलांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे.
आत्महत्या करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे आढळून आले आहे. आजकाल तरुण मुले, मुली ही व्यसनांच्या आहारी जात आहे. त्यांच्यात संयम राहिलेला नाही. पालकांनी जर मुलांना रागविले, अथवा कोणाचा प्रेमभंग झाला तरी मुले लगेच आत्महत्या करतात. पालक व मुले यांच्यातील संवाद हरपला आहे. मुलगा जर ताणतणावात असेल तर पालक हे समाजाच्या भीतीने त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जात नाही. नैराश्य, ताणतणाव, आजारपण, भीती, चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेल्या गोष्टी आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत.
131 मुलांनी आत्महत्या
जिल्ह्यात मागील तीन वर्षांत 131 मुलांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. या सर्व मुलांचे वय हे 18 पेक्षा कमी होते. 2021 मध्ये 36 मुलींनी तर 26 मुलांनी आपले जीवन संपवले आहे. चालू वर्षांमध्ये 10 मुलींनी तर 15 मुलांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांच्या हाती अँड्रॉइड मोबाईल
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वकाही थांबले होते. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हाती अँड्रॉइड मोबाईल आले. काही विद्यार्थ्यांनी याचा चांगला उपयोग केला तर काहींनी वाईट. मोबाईलचा अती वापर, व्यसनाधीनता, रागीटपणा, यामुळे अगदी कमी वयात मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. व्यसनाच्या आहारी गेल्याने मुलांमध्ये मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की चिडचिड येत आहे. छोट्या छोट्या कारणांमुळे मनात नकारात्मकता वाढत आहे.
मुलींमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक
मुलांकडून पालकांच्या अपेक्षा या हल्लीच्या काळात वाढत आहेत. पाल्यावर अभ्यासाचे दडपण येत आहे, मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन शिक्षण देणे गरजेचे आहे. अभ्यासाच्या तणावातून किंवा अपयशातून देखील काही विद्यार्थी नैराश्याकडे झुकतात. मुली भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. मुलांच्या तुलनेत नैराश्याचे प्रमाण मुलींमध्ये अधिक आहे. त्यामुळे नैराश्यातून मुली आत्महत्येचे पाऊल उचलतात.
हेही वाचा - थांब ना नको जाऊस, पती नसताना विवाहित प्रेयसीने केला आग्रह अन् घडलं भयानक कांड
मुलांमध्ये अग्रेशन वाढले
आजकाल अनेकदा पालक व मुले यांच्यात संवाद होत नाही, त्यामुळे मुलांना काही ताणतणाव व नैराश्य आल्यास ते आपल्या पालकांशी बोलू शकत नाही. त्यातूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलतात. 15 ते 24 वर्षाच्या मुलांना स्वतंत्रता पाहिजे असते. त्यामुळे दखल दिली तर मुलांमध्ये राग वाढतो, चिडचिडपणा व हट्टीपणा वाढतो. कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष सर्वाधिक स्मार्टफोनचा वापर झाला यामुळे मुलांमध्ये अग्रेशन वाढले आहे. स्वभावात बदल झाले आहेत, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर लगेच टाकाचे पाऊल उचलले जात आहे. यासाठी पालकांचा मुलांशी चांगला संवाद असणे आवश्यक असल्याचे बीड जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ मोहम्मद मुजाहिद यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.