सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 19 मार्च : सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. कडाक्याच्या उन्हातही ऊसतोड मजूर पोटासाठी फडात कोयता चालवत आहेत. अशा स्थितीत आजारी मजुर कामावर येत नसल्याने मुकादम आणि ट्रक मालकांनी बेदम मारहाण केली. आधीच आजारी त्यात वरुन मारहाण झाल्याने मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी मजुराच्या पत्नीच्या तक्रारीवरुन तिघांवर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
आजारी असलेल्या मजुराला कामवर का येत नाही म्हणत मुकादमाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथे उघडकीस आली. ऊसतोड कामगार श्रीराम आण्णासाहेब कसबे हे आजारी असल्याने काम करू शकत नसल्याने मुकादम व ट्रक मालकांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार मयत ऊसतोड कामगाराच्या पत्नीने धारुर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरून दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाचा - बापानं आयुष्यभर कमवलेले पैसे, दागिने मुलीने एका झटक्यात चोरलं, काय आहे प्रकरण
माजलगाव तालुक्यातील सोन्नथडी येथील ऊसतोड कामगार श्रीराम आण्णासाहेब कसबे हे आजारी असल्याने काम करू शकत नव्हते. मात्र, 16 मार्च रोजी मुकदम अशोक कसबे व ट्रक मालक गंगाधर तिडके यांनी त्यांना दुसऱ्या ट्रकमध्ये भोगलवाडी येथे घेऊन गेले. रागात मुकदम अशोक कसबे व ट्रक मालक गंगाधर तिडके यांनी केलेल्या मारहाणीत पती श्रीराम कसबे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुकादम व ट्रक चालकाविरुद्ध 17 मार्च रोजी रात्री उशिरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर ऊसतोड कामगारांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.