रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 21 मार्च: सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कोर्सेस उपलब्ध होत आहेत. कमी कालावधीमध्ये स्वयं रोजगार उपलब्ध करून देणारे कोर्स विविध महाविद्यालये चालवत आहेत. बीड जिल्ह्यातील एका महाविद्यालयाने अशाच अनोख्या कोर्सला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा कोर्स महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थिनी शिकत आहेत. त्यामुळे आता महिलाही प्लंबिंगची कामे करताना दिसणार आहेत.
मुलीही करणार नळजोडणी
बीड येथील जन शिक्षण संस्था आणि सावरकर महाविद्याल याच्या संयुक्त विद्यमाने अनेक कोर्सेस हे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिले जातात. जेणेकरून कमी कालावधीमध्ये त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा. या वर्षी देखील अशाच नवीन कोर्सची सुरुवात या महाविद्यालयांमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थिनी व महिलांसाठी नळदुरुस्ती, अर्थात प्लंबिंगच्या कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यातील पहिलाच प्रयोग
मुलींसाठी प्लंबिंगचा कोर्स हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. तीन महिन्याच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनी व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्रावरून प्लंबर पदाच्या नोकरीचीही संधी उपलब्ध होणार आहे.
100 पेक्षा अधिक अर्ज
मागील दोन महिन्यांपूर्वी या प्लंबिंग कोर्सची सुरुवात झाली. त्यावेळी या कोर्ससाठी 100 पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी अर्ज केले होते. मात्र यामधून फक्त वीस विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कोर्ससाठी कुठलीही फी आकारण्यात आली नाही. हा कोर्स पूर्णपणे निशुल्क असून बारावी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थिनींसाठी हा कोर्स करण्याची संधी उपलब्ध आहे.
बापमाणूस! पेपर टाकून मुलींना शिकवलं, 2 डॉक्टर तर एकीला केलं वकील, Video
प्लंबिंग कोर्स शेड्युल
आठवड्यातून रोज एक तास या प्लंबिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीविषयी माहिती सांगितली जाते. त्यानंतर दीड तासांमध्ये प्रोफेशनल प्लंबरच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे प्रॅक्टिकल घेतले जाते. यामध्ये प्लंबिंगसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सर्व गोष्टी समजून सांगितल्या जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.