बीड, 8 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हत्येच्या अनेक घटना समोर येत आहेत. तसेच छेडछाडीच्या घटनाही वाढताना दिसत आहे. यासंबंधित बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाड करणाऱ्या तरूणाच्या जाचाला कंटाळून एका 23 वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
लग्नासाठी गळ घालत छेडछाड करणाऱ्या तरूणाला कंटाळुन 23 वर्षीय तरुणीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीड शहराजवळ पांगरबावडी येथे उघडकीस आली. सुमित्रा राजू विटकर, असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथील सुमित्रा राजू विटकर (वय-23) ही तरुणी बीडमधील गांधीनगर भागात राहत होती. ती एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायची. शहरातील शाहूनगर भागात राहणारा किशोर कचरू साठे हा त्या मुलीला लग्नाचा घाट घालत होता. तसेच लग्न केले नाहीस तर पळवून नेईल, अशी धमकीही द्यायचा.
हेही वाचा - गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी
यावरुनच काल दुपारी या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सुमित्रा हिने पांगरबावडी परिसरामध्ये एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत तरुणीच्या बहिणीने फिर्याद दिली. यानंतर आरोपी किशोर साठे याच्याविरोधात कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Sexual harrasment