बीड, 30 मार्च : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीचे धाडसत्र जोरात सुरू आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
का पडली ईडीची धाड?
धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची उभारणी करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एक "एमओयु" साइन केला. त्यानंतर काही काळ उलटला आणि नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून हा कारखाना स्वतःच्या नावे करून पांडुरंग सोळुंके यांना बाजूला केलं. 2013 साली याच कारखान्याच्या नावावर तासगावकर कुटुंबीयांनी 106 कोटी रुपयांच कर्ज पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून घेतलं.
बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च करून कारखान्याचे काम अर्धवट सोडलं आणि कारखाना दिवाळखोरीत काढला. त्यांनतर हे प्रकरण कोर्टात गेलं. मात्र, या कारखान्याचे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असतानाच, ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं, त्या बँकांनी हा कारखाना लिलावात काढला आहे. मात्र हा कारखाना लिलावात काढल्यानंतर आता यामध्ये ईडी आणि सीबीआय यांच्या अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली आहे. आता यामध्ये नेमकी सोळंके की तासगावकर यापैकी कोणाची चौकशी होत आहे का? हे ईडी आणि सीबीआयच्या छाप्यानंतरचं उघड होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.