बीड, 04 जानेवारी : शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मधमाशा पालन व्यवसाय एक प्रमुख उद्योग व्हावा या दृष्टीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. मधमाशा पालन योजना अंतर्गत 50 टक्के अनुदान देण्यात येते. शेतीसमवेत जोडधंदा करत शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतात. नक्की काय आहे योजना, कसा मिळतो लाभ पाहुयात.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा तसेच शेती बरोबरच इतर उद्योगातही शेतकऱ्यांची स्थान वाढावे याकरिता मधमाशा पालन योजना सुरू झालेली आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. बीडमध्ये मागील दोन वर्षापासून मधमाशा पालन योजना सुरू झाली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीसमवेत एक चांगला जोडधंदा मिळाला आहे. योजनेचा लाभ घेऊन शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
काय आहे ही योजना
मधमाशा पालन ही योजना ग्रामोद्योग मंडळातर्फे राबविण्यात येते. मध केंद्र योजनेअंतर्गत होतकरू शेतकऱ्यांना मधमाशा पालनासाठी मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान देखील दिले जाते. या योजनेत शेतकरी वैयक्तिक देखील सहभागी होऊ शकतो. पात्र, शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह दहा मधमाशीच्या भरलेल्या पेट्या, सुरक्षा किट आणि मध काढण्याचं मध यंत्राचा संच दिला जातो.
मोफत प्रशिक्षण
मध संचालनालय महाबळेश्वर आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या अंतर्गत मधपाळ प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या वैयक्तिक अर्जदारांना मंडळाच्या मान्य प्राप्त प्रशिक्षण केंद्रात दहा दिवसाचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
नियम अटी
अर्ज करणारा अर्जदार हा साक्षर असावा. योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराला किमान दहा पेट्या खरेदी करणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे शेती असेल तर प्राधान्य मिळेल, अर्जदार शैक्षणिकदृष्ट्या सातवी उत्तीर्ण असावा, अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्ष असावे.
मकर संक्रातीच्या तोंडावर कुंभार व्यावसायिक अडचणीत, पाहा Video
मध उद्योगाची वैशिष्ट्ये
एक नमुनेदार ग्रामोद्योग, जागा इमारत वीज पाणी यासाठी गुंतवणूक नाही, रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता, वाया जाणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगला उपयोग होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ भाजी मंडी रोड बशीर गंज बीड, महाराष्ट्र या ठिकाणी ऑफलाईन अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02442- 222517.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.