रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 30 मे: पती-पत्नीतील अतूट प्रेमाचे अनेक दाखले आपण ऐकले असतील. अगदी पत्नीच्या प्रेमाखातर शहाजहाननं ताजमहाल बांधल्याचं आपल्याला माहिती असेल. पण बीडमधील 60 वर्षीय शरद कुलकर्णी यांनी आपल्या प्रेमाखातर जगातील सर्वात उंच शिखर गाठलंय. पत्नीच्या निधनानंतर तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे या वयात माउंट एव्हरेस्ट सर करणारे ते एकमेव भारतीय गिर्यारोहक आहेत. सात शिखरे सर करण्याचं स्वप्न कुलकर्णी दाम्पत्य मुळचं बीड जिल्ह्यातील असलं तरी ते ठाण्यात स्थिरावले. शरद दिनकर कुलकर्णी आणि पत्नी अंजली यांना गिर्यारोहणाची आवड होती. दोघांनी जगभरातील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी त्यांनी हिमालयातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट पासून सुरुवात केली. मात्र, हे शिखर सर करताना अपघात झाला आणि हे स्वप्न अर्ध्यावरच राहिलं.
एव्हरेस्ट मोहिमेत पत्नीचं निधन 2019 मध्ये अंजली आणि शरद हे एव्हरेस्ट मोहिमेवर गेले होते. 22 मे रोजी एव्हरेस्ट सर करतानाच एक अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. एव्हरेस्ट हिलेर स्टेपच्या परिसरामध्ये खूप मोठी ट्राफिक जाम झाली. त्या ठिकाणी एकच रोप असतो. एकाच रोपनं शिखरावर चढलं जातं आणि खाली देखील त्याच रोप द्वारे येतात. वेदर विंडो कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी ट्राफिक जाम झाला होता. तेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि अंजली यांचा मृत्यू झाला. पत्नीचं स्वप्न केलं पूर्ण पत्नीच्या निधनानंतर अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय शरद यांनी केला. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी जिद्दीनं सराव सुरू केला. जगभरातील इतर चार शिखरांवर यशस्वी चढाई केली. शेवटी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. पत्नीचं निधन होऊन चार वर्षे पूर्ण होत असतानाच 23 मे रोजी त्यांनी यशस्वी एव्हरेस्ट चढाई केली. जगात कुणाला नाही जमलं, लातूरची सृष्टी नवा रेकॅार्ड करण्याठी सज्ज, VIDEO ही कामगिरी करणारे एकमेव भारतीय वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारे शरद हे एकमेव भारतीय ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 2019 पूर्वीही एकदा एव्हरेस्ट सर केले होते. शिखरावर पाऊल ठेवूनही काही कारणांनी त्यांना तिरंगा फडकावता आला नव्हता. आता त्यांचं तेही स्वप्न पूर्ण झालं आहे. अन् अश्रू अनावर झाले 23 मे रोजी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी मी ज्यावेळेस एवरेस्ट शिखरावर पाय ठेवला त्यावेळेस माझा आनंद गगनात मावत नव्हता. तिथे पोहोचल्यावर आमच्या दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न सत्यात उतरल्यानं मला आनंद अश्रू अनावर झाले. माउंट एवरेस्ट सर करायची संधी कमी जणांना मिळते. मात्र मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सोबत काही असलेल्या सहकाऱ्यांना यावर्षी देखील प्राण गमवावे लागले. त्या गोष्टीचं मला अत्यंत वाईट वाटतंय, असं शरद कुलकर्णी म्हणाले.