सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 22 मार्च : राजकारणासाठी प्रसिद्ध असलेला बीड जिल्हा आता गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध होत आहे. बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हात एका दिवसात दोन अल्पवयीन मुलींची छेड तर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. परिणामी जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काय आहे प्रकरण?
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली तर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील बाबा चौकात एका हॉटेल चालकाने 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. सदरील बाब समोर आल्यानंतर या चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. तिन्ही आरोपींविरोधात पोस्को कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.
वाचा - मुलगी बापावर गेली, सासरच्यांचे टोमणे ऐकून आईने 3 महिन्यांच्या लेकीला संपवलं
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकाकडे आली असता गावातीलच परमेश्वर गडदे या 26 वर्षीय नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात पिडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 376, 376 (2) (एफ) भा.दं.वि.सह कलम 4,8,12 पोस्कोनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड मातोरी येथील नराधम सचीन रघुनाथ घाटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच दहावीतील मुलीच्याचा बालविवाह
परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका 16 वर्षीय मुलीचा, गावालगत असणाऱ्या चोपणवाडी येथील तरुणाशी आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असुन तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र, ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला. बीड येथील चाईल्ड लाईन सदस्य तत्वशिल कांबळे यांना माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासकीय यंत्रणा नंदागौळला पोहचण्यापुर्वीच बालविवाह झाला. त्यानंतर तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime, Women safety