सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 2 एप्रिल : कोरोना काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा तारणहार म्हणून समोर आला. आजही तो त्याच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक मदत करत असतो. याचाच गैरफायदा घेत बीडमध्ये अभिनेता सोनू सुदच्या नावाखाली 69 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काय आहे प्रकरण? तलावात बुडून एकाच कुटुंबातील 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबाला अनेकांनी आर्थिक मदत केली. नंतर सोनू सूदच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी याच मदतीच्या पैशांवर डल्ला मारला आहे. एनी डेस्क अॅप डाऊनलोड करायला लावून सर्व ओटीपी घेत 69 हजार 566 रुपये ऑनलाइन लुटल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील पैठण येथे 21 मार्च रोजी जयराम हरिभाऊ चौधरी यांच्या मुलासह दोन पुतण्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने नातेवाईक, मित्र परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांना आर्थिक मदत केली. याच पैशांवर सायबर भामट्यांचा डोळा होता. 30 मार्च रोजी जयराम यांना सोनू सूद फाउंडेशन कार्यालयातून बोलत असल्याचा एक कॉल आला. “तुम्हाला 3 लाख रुपयांची मदत करायची असून मी विचारलेली माहिती सांगा, असे यांना घुमवले. त्यांना मोबाइलमध्ये एनी डेस्क अँप डाऊनलोड करायला लावून पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड, बैंक पासबुक आदींची माहिती घेतली. वाचा - भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भर रस्त्यात आरोपींचा अंदाधुंद गोळीबार नंतर वेगवेगळे ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून 10 हजार, 9 हजार 999, 18 हजार 321, 18 हजार 297, 5 हजार, 4 हजार 800 आणि 3 हजार 49 असे 69 हजार 566 रुपये ऑनलाइन काढून घेतले. पैसे कट झाल्याचे समजताच चौधरी यांनी परत त्याच क्रमांकावर कॉल केला. परंतु, तो नंबर बंद होता. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चौधरी यांनी आगोदर युसूफवडगाव आणि नंतर सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. दरम्यान याप्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.