बीड, 27 फेब्रुवारी : राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र, त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात, स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावानं, आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळालं. यादरम्यान “अभी जिंदा हु तो जी लेने दो” या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला. तर “चंद्रा” या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला. खरं पाहिलं तर यांचा हा धिंगाणा पाहून, नेमकं हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांना आपली मौज मजा करत धिंगाणा घालण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. याचंदेखील भान या अधिकाऱ्यांना राहिलं नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून आपल्याला देखील शेतकऱ्यांच्या नावावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवात नेमकं काय चाललंय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासनाकडून कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी आयोजित केला जातो. या कृषी महोत्सवांमधून शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा, कल्पना आणि शेती उपयोगी सर्वच माहिती मिळावी. यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून या कृषी महोत्सवाचे आयोजन केलंय. मात्र, याच शासनाच्या अधिकाऱ्यांनी हे भान सोडून बेभान होत धिंगाणा घातला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.