'भाजीपाला जनावरांना टाकू, पण आता शहरात आणणार नाही', अमानुष मारहाणीनंतर संतापले शेतकरी

'भाजीपाला जनावरांना टाकू, पण आता शहरात आणणार नाही', अमानुष मारहाणीनंतर संतापले शेतकरी

'भाजीपाला जनावरांना टाकू, पण शहरात विक्रीला जाणार नाही,' असं म्हणत बीडमधील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

बीड, 6 एप्रिल : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचार बंदी शिथिल असताना ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी शहरात आलेल्या काही शेतकऱ्यांना नगरपालिका प्रशासनाकडून अमानुष मारहाण करत त्यांचा भाजीपाला कचराकुंडीत टाकून देण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर 'भाजीपाला जनावरांना टाकू, पण शहरात विक्रीला जाणार नाही,' असं म्हणत बीडमधील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

बीड शहराजवळील बऱ्याच शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीला जाणे बंद केले आहे. त्यामुळे हा भाजीपाला जनावरांना टाकून देण्याची वेळ आली. नाळवंडी गावातील तब्बल 300 शेतकरी कुटुंबांनी भाजीपाला विक्रीवर बहिष्कार घालत विक्री बंद केली. नाळवंडी गावातून दररोज 5 टन भाजीपाला बीड शहरात येतो.

संचार बंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र प्रशासनाकडून बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे यापुढे भाजीविक्री करणार नसल्याचा निर्णय इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. वेळ पडल्यास भाजीपाला गुरांना खाऊ घालू, परंतु बीड शहरात भाजीपाला पाठवणार नाही, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

बीडमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती?

कोरोनाबाबत बीडकर काहीसे नशीबवान ठरले आहेत. कारण बीडमध्ये अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील एकूण 98 जणांचे नमुणे स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित 34 जणांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहेत.

First published: April 6, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या