• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बँकेतील कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या पैशावर मारला डल्ला, धक्कादायक प्रकार उघड

बँकेतील कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या पैशावर मारला डल्ला, धक्कादायक प्रकार उघड

बँकेच्या कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या खात्यातील रक्कमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधील (Ambernath Crime news) एका बँकेत घडला आहे.

  • Share this:
अंबरनाथ, 31 मार्च : बँकेत तुमची रक्कम(ठेव) सुरक्षित असते असं नेहमीच म्हटलं जातं. परंतु चोराने बँक लुटून तुमची रक्कम लंपास केली तर ऐकूनच मनात धडकी भरते. मात्र चोराऐवजी बँकेच्या कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या खात्यातील रक्कमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधील (Ambernath Crime news) एका बँकेत घडला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बँकेतील रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्याला एक हात नाही, तो अपंग आहे. तरी देखील त्याने चोरीचं एवढं मोठं धाडस केलं. त्याच्या या कारनाम्यामुळे पोलिसांनी बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस ठाण्याच्या कोठडीत केली आहे. अंबरनाथ पश्चिम भागात स्टेशन परिसरात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही बँक आहे. या बँकेत सुमित मंगलानी हा क्लार्क म्हणून काम करतो. सुमितला पैशाची चणचण होती .त्यामुळे त्याने आपल्या एका ओळखीच्या खातेदारासह एक योजना आखली. ही योजना होती बँकेतील खात्यामधील रक्कमेवर डल्ला मारण्याची. त्यानुसार नोव्हेंबर 2020 पासून जानेवारी 2021 महिन्यापर्यंत या मंगलाणी यांनी आपल्याच बॅंकेतील 12 खातेदारांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खातेदाराच्या खात्यात वर्ग केले. हेही वाचा - लॉकडाऊनदरम्यान मध्यरात्री औरंगाबादमधील हॉटेलवर अज्ञाताचा गोळीबार; परिसरात दहशतीचं वातावरण हे करत असताना त्याने विशेष काळजी घेतली ती म्हणजे त्याने अशी 12 खाती निवडली जी मोबाईल नंबरशी लिंक नाहीत. म्हणजे रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केल्यास त्याची कोणतीही माहिती खातेदारांना मिळणार नाही. या सर्व खातेदारांची तब्बल 11 लाख 60 हजार 800 रुपये एवढी रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर वळती करत केली. ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम त्याने दुसऱ्या खात्यात वर्ग केली होती. खातेदार आणि बँकेच्या ही बाब लक्षात आल्यावर बँकेच्या मॅनेजरने अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार केली. अंबरनाथ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तरे,पोलीस नाईक राजवळ,सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार म्हसे या पथकाने तपास सुरू केला. यावेळी बँकेचा कर्मचारी सुमित मंगलानी आणि खातेदार विजय गुप्ता यांनी संगनमत करून हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच पोलिसांनी या दोघांना अटक केली. विशेष म्हणजे अपहार करणारा बँकेतील सुमित मंगलानी हा अपंग आहे. दोघांनी आपापसात संगनमत करून हा अपहार केल्याचे तपासात समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. तसेच बँकेतील प्रत्येक खातेदाराने आपले खाते हे आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करावे, एखादे वयोवृद्ध अथवा अशिक्षित खातेदार असेल त्याने आपल्या कुटुंबातील विश्वासू व्यक्तीच्या मोबाईल नंबरसोबत आपले खाते लिंक करावे जेणेकरून आपल्या खात्यात जमा झालेली किंवा काढलेली रक्कम आपल्याला मोबाईलवरील मेसेजद्वारे कळू शकेल आणि आपली फसवणूक होणार नाही, असं आवाहनही धुमाळ यांनी केलं आहे. सध्या या दोन्ही आरोपींना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रियेत आणखी कोणी सहभागी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: