मुंबई, 19 मार्च : बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईतल्या मीरा रोड परिसरात भव्य असा दरबार पार पडला. या दरबाराच्या आयोजनापासून सुरू झालेला वाद अद्याप संपलेला नाही. यात आणखी एका भर पडली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर एकाच वेळी जवळपास ५० ते ६० लोक मीरा रोड स्टेशनमध्ये पोहोचले. यात सर्वाधिक महिलांचा समावेश होता. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारावेळी चोरट्यांनी दागिने चोरल्याची तक्रार देण्यासाठी हे सर्वजण पोहोचले होते.
धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत महिलांचे मंगळसूत्र, गळ्यातील चेन याशिवाय इतर दागिने लंपास केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३६ महिलांनी मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. धीरेंद्र शास्त्रींचे अनुयायी मोठ्या संख्येने दरबारात आले होते. शनिवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सुरू झालेला दरबार रात्री ९ वाजता संपला.
राज्यात पुन्हा पाऊस थैमान घालणार, हवामान खात्याकडून हाय अलर्ट
महिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत ४ लाख ८७ हजार इतकी आहे. महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मीरा रोडवर धीरेंद्र शास्त्रींच्या २ दिवसांच्या दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून राजकीय वातावरणही तापलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेस आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबा बागेश्वर यांच्या दरबाराला विरोध केला होता. तर काँग्रेसने दरबार लावू नये असा इशाराही दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून धीरेंद्र शास्त्रींच्या दरबाराला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. भाजप आमदार गीता जैन आणि जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी शनिवार आणि रविवारी प्रवचनाचा कार्यक्रम आय़ोजित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.