मुंबई, 24 ऑक्टोबर : भाजपमध्ये घुसमट होत असल्याने अखेर कमळ बाजूला सारत एकनाथ खडसे यांनी हाती घड्याळ घेतलं. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्र अनाथ होणार आणि राष्ट्रवादीला नाथ मिळाल्यानं त्यांना चांगले दिवस येतील असंही बच्चू कडू म्हणाले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना बच्चू कडू यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. धनंजय मुंडे काय म्हणाले? खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपचा खान्देशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वडिलांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू असल्यामुळे मी परळीत आहे, अन्यथा मी सुद्धा नाथाभाऊंच्या स्वागत सोहळ्यास व्यक्तिशः उपस्थित राहिलो असतो, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. हे वाचा- ताई, दादा आणि भाऊ! सुप्रिया सुळेंनी अखेर अशी घडवली अजित पवार आणि खडसेंची भेट अजित पवार काय म्हणाले? अजित पवार म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा.खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून हातात असलेलं कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. आतातरी एकनाथ खडसे यांची वेळ बदलणार का याकडे समर्थकांसह सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.