अमरावती, 28 सप्टेंबर : आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बच्चू कडू अडचणीत आले. गणोजा गावातला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता बच्चू कडू आणि कार्यकर्त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. सौरभ इंगोले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि सौरभ इंगोले माध्यमांसमोर आले. बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या व्हिडिओचा विपर्यास केला गेला, असं बच्चू कडू म्हणाले. तसंच मी फक्त थांब म्हणालो, मारहाण केली नाही. कार्यकर्त्यांसोबत आमचं कौटुंबिक नातं आहे, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी केलं. दुसरीकडे सौरभ इंगोले या कार्यकर्त्यानेही बच्चू कडू यांचा बचाव केला आहे. बच्चू कडू मला फक्त थांब म्हणाले, समोरचा व्यक्ती ऐकत नव्हता, त्यांनी माझ्या कानशिलात लगावली नाही. दुसऱ्याला खोटी प्रसिद्धी हवी होती, म्हणून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केला गेला, असा दावा सौरभ इंगोले यांनी केला आहे.
बच्चू कडू यांना राग अनावर, कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली pic.twitter.com/n11FtwbWg4
— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2022
नेमकं काय झालं? अमरावतीच्या गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. रस्त्याच्या कामकाजासंदर्भात कार्यकर्त्यांनी त्यांना पाहण्यासाठी बोलावले होते, त्यावेळची ही घटना आहे. आपल्या हातातून घडलेल्या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याची समजूत काढली आणि खांद्यावर हात ठेवून सोबत घेऊन गेले. काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्याशी वाद घातलण्याप्रकरणी गिरगांव कोर्टाने बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्याच दिवशी त्यांना जामीनही मिळाला. सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. या प्रकरणी बच्चू कडू गिरगांव कोर्टात हजर झाले होते. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी हायकोर्टात धाव घेऊन जामीन मिळवला.