औरंगाबाद, 18 सप्टेंबर : कामावरुन काढल्याच्या रागातून पुण्यात मालकिणीवर पेट्रोल टाकून तिची हत्या करण्यात आली होती. याचप्रकारची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. कामावरुन कमी केल्याच्या रागातून कामगाराने बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यात आडवून बेदम मारहाण केली. तसेच बिल्डरच्या खिशातील 15 हजार रुपये हिसकावून पोबारा केला. काय आहे संपूर्ण प्रकरण - अरुण वाघमारे, असे यातील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कैलास नानासाहेब पवार (56, रा.जाधववाडी, सिडको) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे अरुण वाघमारे हा कामाला होता. त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. अरुण याने आपल्याला कामावरुन काढल्याचा राग मनात ठेवला होता. त्यामुळे त्याने प्रदीप घनवट (दोघे रा. जोगवाडा) याच्या मदतीने बांधकाम व्यावसायिक कैलास पवार यांना जोगवाडा शिवारातील चिमनपीर येथे शनिवारी सायंकाळी अडवले. यावेळी त्यांना वाहनातून खाली उतरवित पोटात लाथ मारली. त्याचवेळी घनवट याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने मारुन पवार यांना जखमी केले. यावेळी पवार यांच्यासोबत असलेला साहिल भंडारी हा त्यांच्या मदतीसाठी धावला. मात्र, यावेळी त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पवार याच्या पॅन्टच्या खिशातील 15 हजार रुपये बळजबरीने हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरुन पोबारा केला. हेही वाचा - औरंगाबादेत अपहरण नाट्याचा थरार, 4 कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचं सिनेस्टाईल अपहरण या घटनेनंतर याप्रकरणी निरीक्षक शिवाजी तावरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांच्याकडे अधिक तपासासाठी सोपवण्यात आला असून ते याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.