औरंगाबाद, 3 जुलै : भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षावर सीबीआयची (Aurangabad BJP Yuva Morcha district president ) रेड पडल्याचं वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली. पण प्रत्यक्षात सीबीआय अधिकाऱ्यांची (CBI Raids) टीमच स्पेशल छब्बीस चित्रपटाप्रमाणे बनावट निघाली. त्यामुळे औरंगाबादमध्ये स्पेशल छब्बीसची जोरदार चर्चा सुरू आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील माजी नगराध्यक्ष तथा भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रेड पडल्याची माहिती समोर आली. मात्र या अधिकाऱ्यांच्या हालचालीवर संशय आल्याने लोळगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता हा अधिकारी तोतया सीबीआयचा असल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीआयचे या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुरज लोळगे हे आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये असताना हातामध्ये फाइल आणि डायरी घेऊन विठ्ठल हरगुडे नावाची व्यक्ती दुकानात आली. त्यानंतर तिने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या दुकानावर रेड पडली असल्याचे सुरज लोळगे यांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यावरून सुरज लोळगे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली.
पोलिसांनी ज्वेलरी शॉपमध्ये येऊन तोतया सीबीआय अधिकाऱ्याची आधी विचारपूस करून चौकशी केली. त्यानंतर त्याचे ओळखपत्र आणि अधिकारी दोन्ही बनवटी असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी तोतया सीबीआय अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन ज्वेलरी शॉप मालक सुरज लोळगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे स्पेशल छब्बीस चित्रपटाप्रमाणे औरंगाबादमध्ये या तोतया सीबीआय अधिकाऱ्याने लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला पोलीस ठाण्याची हवा खावी लागली आहे. मात्र या घटनेमुळे पैठण शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.