सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 8 ऑगस्ट : सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) त्यांच्या बिनधास्त बोल आणि राजकीय भूमिकांमुळे सतत चर्चेत असतात. TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याने आज सत्तार पुन्हा चर्चेत आलेत. अब्दुल सत्तार बिनधास्त नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्यात अब्दुल सत्तार पाहिले नेते, त्यामुळे मराठवाड्यातील सेना आमदार खासदार बंडखोरीकडे ओढले अशी चर्चा आहे. TET घोटाळ्याच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव आल्याने खळबळ उडाली.या सर्व आरोपांना नकार अब्दुल सत्तार यांनी लगेच दिला. आता या लिस्ट मागील राजकीय नात्याची कुजबुज सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार हे शिंदे सरकार (CM Eknath Shinde) मध्ये मंत्रिपदाचे (Cabinet Expansion) प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 60:40 फॉर्म्युला ठरल्याने शिंदे गटाला 16 किंवा 17 मंत्री पद मिळणार आहेत. 50 जणांमध्ये 17 मंत्री पद विभागणे शिंदे यांच्यासाठीही अडचणीचे आहे. 17 जणांमध्ये आपले नाव लागावे यासाठी धडपड सुरू आहे. सर्वच बंडखोर मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून 5 बंडखोर आहेत. या 5 जणांमधून केवळ दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सत्तार यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रबळ दावा असल्यानेच नेमकी आज लिस्ट आली आणि लिस्ट मध्ये सत्तार यांच्या चार अपत्यांची नावही आली. हा योगायोग नाही. सत्तार यांच्या मार्गात काटे टाकण्याचे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे. विरोधकांनीही आता सत्तार यांच्या विरोधात त्यांना अडचणीत आणण्यासाठी हालचाली आणि राजकीय वक्तव्य सुरू केली आहेत. औरंगाबाद मधून मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी अब्दुल सत्तार, संजय सिरसाट, संदीपान भुमरे सातत्याने प्रयत्नशील आहेत. जिल्ह्याला दोन मंत्रिपद आणि पालकमंत्री मिळणार आहे. स्पर्धेत तिघे असल्याने एकाचा पत्ता कापणे आवश्यक आहे, जेणेकरून इतरांचे मंत्रिपद पक्के होईल. TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या चार अपत्यांची नाव आली, त्याचा तपास होईल, सत्य बाहेर येईल…तुर्तास या चर्चा आणि लिस्ट मुळे अब्दुल सत्तार यांच्या संभाव्य मंत्री पदाला ग्रहण लागू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.