सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च : बौद्धिक विकासासाठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचे मैदान असणे आवश्यक असतं. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शाळांमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात 4571 शाळा आहेत. यापैकी 344 शाळांमध्ये खेळासाठी मैदानच उपलब्ध नसल्याची माहिती जिल्हा परिषेदेच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीमधून उघडकीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शाळामध्ये असताना मुलांचा बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने शाळा तिथे खेळायची मैदाना अशी संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. यासाठी शिक्षण व क्रीडा विभागाने पहिलीच्या वर्गापासूनच क्रीडा विषय लागू केला आहे. राज्य शासनातर्फे विविध उपाय योजना राबवण्यात येतात. मात्र, असं असलं तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र याचं पालन होतंय का असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 4571 शाळा आहेत. ज्यामध्ये काही जिल्हा परिषदेच्या काही खाजगी तर काही अनुदानित तर काही विनाअनुदानित शाळा आहेत. मात्र, या शाळांपैकी 344 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदानच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांचे होतंय नुकसान
शाळेत खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे इच्छा असतानाही विद्यार्थ्यांना खेळ खेळता येत नाही.
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत नाही.
विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी मिळत नाहीत.
विद्यार्थ्यांचा क्रीडाविषयक तास वाया जातो.
सरकारने गांभीर्याने बघावं
शाळा म्हणजे फक्त बौद्धिक विकास नाही तर त्यामध्ये शारीरिक विकास देखील होत असतो. अनेक शाळांमध्ये पैसे आकारले जातात. मात्र, सुविधा दिल्या जात नाही. शाळांमध्ये खेळाचे मैदान नसतील तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास कसा होणार या संपूर्ण प्रकाराकडे शिक्षण विभागाने आणि राज्य सरकारने गांभीर्याने बघावं अशी आमची मागणी असल्याचे पालक दौलत शिरसवाल यांनी सांगितले.
Beed News: जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेन कॅप, पाहा काय आहे उपयोग? Photos
खेळाची मैदान असणं अत्यंत आवश्यक
ज्या शाळांमध्ये खेळासाठी मैदान उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणच्या शाळेचे शिक्षकांकडून इतर ठिकाणी खेळाचे मैदान उपलब्ध करून विद्यार्थ्यांकडून खेळ खेळून घेतले जातात. अनेक शाळांमध्ये मैदान आहेत मात्र त्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत तर काही ठिकाणी पूर्वीच्या तुलनेत मैदानी छोटी झाली आहे. शाळांमध्ये खेळाची मैदान असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये खेळाची मैदान उपलब्ध नाही. त्या शाळांनी खेळायचे मैदान उपलब्ध करून द्यावी अशा सूचना आम्ही केल्या आहेत अशी माहिती शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.