औरंगाबाद, 20 एप्रिल : आजच्या आधुनिक काळात सर्वकाही ऑनलाइन घेता आणि विकता येतं. पण काही नराधमांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर माणुसकीच विकायला काढली आहे. कारण गर्भातील बाळ ऑनलाइन विकायला काढल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. मेहुनीच्या पोटातील मुलं जन्मायच्या आधीच दत्तक देण्याच्या नावाखाली चार लाख रुपयांना विकायला काढल्याचा प्रकार सायबरसेलने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी निकिता खडसे व शिवशंकर तांगडे या दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवशंकर तांगडेला अटक केली आहे. निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी फेसबुकवरील आपल्या खात्यात एक संदेश पाठवला होता. शिवशंकरने त्याच्या संदेशात म्हटले होते की, त्याची मेहुणी सात महिन्यांची गरोदर असून तिला तिच्या नवऱ्याने सोडले आहे. तिचे दुसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे मेहुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते विक्री करायचे आहे. त्याबदल्यात पैशांचीही त्याने मागणी केली होती. निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी पीपल अॅडॉप्शन ग्रुपमधून दत्तक मूल घेऊ इच्छिणाऱ्यांची यादी देखील मिळवली होती. तसेच त्यातील काहींशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करून आर्थिक व्यवहाराची चर्चाही केली होती. जन्माला येणाऱ्या बाळाची चार लाखांपर्यंतची किंमत सांगण्यात आली होती. ही बाब महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत क्रांतिचौक पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर शिवशंकर तांगडे याचा पत्ता सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी व त्यांच्या पथकाने शोधला. हेही वाचा- ‘तुमचा तर मृत्यू झालाय’, जनधनचे पैसे आणायला बँकेत गेल्यावर महिलेला मिळालं धक्कादायक उत्तर शिवशंकर तांगडे हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असून सध्या तो औरंगाबादजवळील रांजणगावातील शेणपुंजी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर सेल पोलिसांनी सापळा रचून शिवशंकर तांगडेला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.