मुलासमोरच आई-वडिलांनी सोडला जीव, मृत्यूनंतर 3 दिवसांनी उघडकीस आली घटना

मुलासमोरच आई-वडिलांनी सोडला जीव, मृत्यूनंतर 3 दिवसांनी उघडकीस आली घटना

धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या पोटच्या मुलासमोर हा सगळा प्रकार घडला असूनही तो मुलगा काहीच करू शकला नाही.

  • Share this:

सोलापूर, 11 मे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अर्थात या लॉकडाऊनच्या काळात देशात आणि विशेषतः कामगारांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात न भुतो न भविष्यती अशा अगणित समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक भरडला जातोय असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मूलबाळ नसलेली वृध्द दाम्पत्य मंडळी. सोलापुरात मात्र एक हृदयद्रावक घटना घडल्याचे पाहायला मिळाली आहे.

सोलापुरातील शास्त्रीनगर या रेड झोनमध्ये भूक आणि उष्माघातामुळे वृध्द दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुर्दैवी बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या पश्चात तीन दिवसानंतर या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजली. अब्दुलगनी शिलेदार (वय 65) तर हसीना शिलेदार (वय 60) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या पोटच्या मुलासमोर हा सगळा प्रकार घडला असूनही तो मुलगा काहीच करू शकला नाही. कारण त्यांचा मुलगा हा बुध्दीबधीर (मतीमंद) असल्याने त्याला ही गोष्ट त्याच्या लक्षातच आली नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यादेखत आई वडिलांच्या मृत्यूचा मूक साक्षीदार होण्याची दुर्दैवी वेळ त्या मुलावर आल्याची माहिती शिलेदार दाम्पत्यांच्या नातेवाईकांनी दिली.

वास्तविक पाहता या दाम्पत्याचे नातेवाईक रोज त्यांच्या सेवेसाठी आणि डबा देण्यासाठी त्यांच्या घरी जात असत. मात्र लष्कर भागात राहणारे अशपाक शिलेदार यांच्या घराजवळील भागही कंटेंटमेंट झोन जाहीर झाल्याने त्यांना वृध्द दाम्पत्यांना तीन दिवस डबा देता आला नाही. त्यामुळे या वृध्द दाम्पत्यांचा भूक आणि उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या मृत शिलेदार दाम्पत्यांचा मुलगा मतीमंद असूनही तो परिसरातील सर्वांना सांगत होता, आम्मी मर गई... आम्मी मर गई... मात्र तो मतीमंद असल्याने त्याच्या बोलण्यावर शेजार-पाजारच्या लोकांपैकी कोणीच विश्वास ठेवला नाही. तीन दिवसानंतर अशपाक शिलेदार आणि त्यांचे सहकारी जेव्हा घरी गेले तेव्हा हा प्रकार समजला. नातेवाईक अशपाक यांच्या मते, मावशी गेल्या अनेक दिवसापासून आजारी होती तर मावशीच्या मृत्यूमुळे काकांना जबर धक्काबसला आणि त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, शास्त्रीनगर भागात रेशन कार्डद्वारे देण्यात येणारे धान्य शिलेदार दाम्पत्याला देण्यात आले होते का? याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विचारले असता त्यांनी याबाबतची माहिती घेऊन उचीत कार्यवाही करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे बळी कोरोनाऐवजी भूकबळीने जातील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 11, 2020, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading