नागपूर, 25 जुलै : पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागासह शहरी भागांमध्ये देखील साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर मानवी वस्ती मध्ये आढळून येत असल्याच्या घटना आपण कायम ऐकत अथवा वाचत असतो. साधारणतः एखादा साप किंवा तस्मम प्राणी बघितला की भीती वाटते. मात्र, अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील उत्तमसरा या गावातील घरामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 10 अजगर आढळून आले आहेत. सुदैवानं यात कुठलाही अनुचित प्रकार न घडता वेळीच सदर घटनेची माहिती वसा अॅनिमल्स रेस्क्यू टीमच्या सदस्यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने या अजगरांना सुखरूप निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. घरात तब्बल 10 अजगर पावसाळ्याला सुरुवात होताच मानव वस्तीत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या आढळण्याच्या घटनेमध्ये खूप वाढ होते. मात्र घरात तब्बल 10 अजगर आढळणे हे एक नवलच म्हणावे लागेल. मागील चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततचा लागून येत असलेला पाऊस सुरू असतांना परवा रात्री उत्तमसरा गावातील रहिवाशी बंडू मतालाने यांच्या घराजवळ एक साप आढळल्याची माहिती वसा संस्थेला मिळाली.
वसा अॅनिमल्स रेस्क्यू टीमचे सर्पमित्र ओम यावले आणि मुकेश मालवे यांनी तो साप अजगराचे पिल्लू असल्याची पुष्टी केली. त्या नंतर रात्री 2 वाजता सुनीता यावले यांच्या घरात झोपण्याच्या गादीत, चुली मध्ये, टिनाच्या कप्प्यात, अंगणात असे 6 अजगराची पिल्ले सर्पमित्र ओम आणि कार्तिक सावरकर यांनी रेस्क्यू केले. रात्री अधीक पिल्ले निघतील या भीतीने यावले कुटुंबीयांनी ती रात्र जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील प्रकाश सुरकार यांच्या घरी सुद्धा अजगराचे पिल्लू आढळून आले. त्यांनी ते स्वतः प्लास्टिक डब्यात बंद करून नदी वर नेऊन सोडले. त्या नंतर शेजारी राहणारे कैलास रंगारी हे खोद कामा करिता पावडे घेण्यासाठी बकऱ्यांच्या गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्याच्या टिनात अजगराचे पिल्लू दिसून आले. ते पिल्लू सुद्धा वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी रेस्क्यू केले. दिवस भर पावसाने उघाड दिल्या नंतर गावात कुठे अजगराचे पिल्ले आढळून आले नाहीत. मात्र रात्री पावसाला सुरू होताच तब्बल 8 फूट लांबीची अजगराची मादी कुलपत शेंडे यांच्या गोठ्या जवळ आढळून आली. तिला बघायला गावातील नागरिकांनी गर्दी केली. ही माहिती वसा संस्थेला मिळताच सर्पमित्र मुकेश मालवे यांनी मोठ्या शिफास्तीने तिला रेस्क्यू केले. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक वन विभागाला देण्यात आली. वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करून मादी अजगर आणि सर्व पिल्लांना नजीकच्या अधिवासात मुक्त केले, अशी माहिती उत्तमसरा येथील वसा संस्थाचे सर्पमित्र मुकेश मालवे यांनी दिली.
Snake Bite : साप चावल्यावर घाबरु नका, ‘या’ उपचारानंतर वाचेल तुमचा जीव, Video
पिल्लांचा जन्म होईस्तोवर मादी अजगर जागा सोडत नाही अजगरांचा हिवाळ्यात प्रजनन काळ असतो, डिसेंबर - जानेवारी दरम्यान मादी अजगरा मागे 3 ते 6 नर आकर्षित होऊन प्रजननासाठी एकत्र येतात. या मध्ये सर्वात सुदृढ नराला मादी सोबत प्रजनन करता येते. त्या नंतर एप्रिल-मे दरम्यान मादी अजगर सुरक्षित जागा बघून त्यात अंडी प्रसाविते. शेताच्या धुऱ्यावर, बांधावर, ओढ्या काठी, साचविलेल्या लाकूड इंधनाच्या खाली, जुन्या मातीच्या घरात, गुरांच्या गोठ्यात ही मादी अंडी प्रसाविते. आणि अंड्याना उबविण्या करिता त्यांना गुंडाळी मारून बसली राहते. या दरम्यान मादी साप काहीच खात पित नाही. अंड्यातून 57 - 93 दिवसात पिल्लं बाहेर पडतात. पूर्ण पिल्लं बाहेर आल्या नंतर मादी अजगर जागा सोडते. आम्हाला जिथे हे अजगर आढळले तिथल्या सर्व घरांच्या परिसराची आम्ही वनाधिकार्या सोबत पाहणी केली, अशी माहिती सर्प अभ्यासक शुभमनाथ सायंके यांनी दिली.