मुंबई, 23 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क साठीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. फक्त प्रवेशपत्रिकाच नाही तर विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, आधार क्रमांक आणि घराचा पत्तादेखील सर्वांसाठी उपलब्ध झाला. यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. तर या विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी उडी घेतली आहे. फेसबुक पोस्ट लिहिती अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हे प्रकरण खूपच गंभीर : अमित ठाकरे गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली; पण आजचं एमपीएसी डेटा लीक प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसंच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसंच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.
‘डेटा खूप मौल्यवान आहे’ हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची ‘महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन’ हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल, असंही ठाकरे म्हणाले. वाचा - उद्धव ठाकरेंची पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका, एकेरी भाषेतच बोलले काय आहे प्रकरण? कधी हॉलतिकीट वेळेत मिळत नाही, तर कधी परीक्षाच पुढे ढकलल्या जातात, तर कधी परस्पर गुण कमी केले जातात. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कायमच अभ्यासासोबत अधिक चिंता असते ती परीक्षा पार पडण्याची, एवढ कमी होतं तर आता विद्यार्थ्यांची गोपनीय माहितीसुद्धा जगजाहीर झालीय. येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क’साठी संयुक्त पूर्व होणार आहे. या परीक्षेकरिता लागणारे हॉल तिकीट टेलिग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालं. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एक टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हायरल झाली जी जॉईन केली असता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या 90 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सहज डाऊनलोड करता येत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच हॉलतिकीट वितरित करण्यात आले. ते डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो, तो प्रविष्ट केल्यानंतरच हॉलतिकीट डाऊनलोड करता येतं, असं असूनही अगदी सहजरित्या या टेलिग्राम ग्रुपवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि सोबत गोपनीय माहिती जाहीर करण्यात आली. या ग्रुपवर एक मेसेज करण्यात आला ज्यात म्हटलंय की, “हा फक्त नमुना आहे, आमच्याकडे सर्व MPSC विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली प्रमाणपत्रे, आधार क्रमांक, खासगी दूरध्वनी, इमेल आयडीसुद्धा आहेत. सोबत पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे.” सोशल मीडियामुळे जसा फायदा होतो तसा त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.