अकोला, 14 जून :एखाद्या शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यानं आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा परिस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून जावं लागते. अशावेळी आपणही त्या कुटुंबाचा एक भाग आहोत ही भावना घेऊन त्यांना साथ देण्याचा संकल्प बाळापूर तालुक्यातील नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेल मालकाने केला आहे. मुरलीधर राऊत असे त्यांचे नाव असून मराठा हॉटेलचे ते संचालक आहेत.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न मोफत लावून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. आतापर्यंत 22 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न लावण्यात आले आहेत.
हेही वाचा-Career After 12th: मुलींसाठी 'हा' कोर्स अगदी मोफत!, जाणून घ्या SPECIAL REPORT
मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे स्वतः शेतकरी असून शेतकरी कुटुंबीयांना साथ दिली जावी या उद्देशाने त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले आहे. राऊत नेहमीच सामाजिक दायित्व निभावत आले आहेत. त्यांनी नोट बंदीच्या काळात राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे पैसे नव्हते तेव्हा हॉटेलात त्यांनी जेवण करुन घ्या पैसे परत येताना द्या, असा उपक्रम चालवला होता. या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मन की बात मधून कौतुक केले होते.
आतापर्यंत 22 आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि छत्र हरवलेल्या कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न पार पाडले आहेत. अजुनही येणाऱ्या काळात काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब किव्हा छत्र हरवलेल्या मुला-मुलींचे लग्न लावून दिले जातील. यात पाहुणे मंडळींचा संपूर्ण जेवणाचा खर्च, हॉल, यासह संपूर्ण खर्च होटेल संचालक करत असून शेतकरी कुटुंबाला कुठलाही खर्च येत नाही.
वडीलांपोठोपाठ आईचेही छत्र हरपले...
बाळापूर तालुक्यातील व्याळा गावची दुर्गा ही अशीच एक मुलगी. तिचे वडील भास्करराव तराळे आणि आई प्रमिला या दोघांचे छत्र हिरावले गेलेले. काळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. मातापित्याचे छत्र असलेच म्हणजे मुलं मोठी होतात असे नव्हे, ती मोठी होतातच. अशीच दुर्गाही मोठी झाली. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वीच झाले होते. अशा या तीन बहिणींचे छत्र काही वर्षा अगोदरच हरवलं. वडील एका गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे वडील त्यांच्यातून लवकरच निघून गेले. काही दिवसांनी आईला हार्ट अटॅक आला आणि तीही त्यांच्यातून निघून गेली.
नवरी मुलगी दुर्गा हीचे मेव्हुणे व मामा ह्यांनी मिळून तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरु केले. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथील विलासराव बहुरुपी यांचे चिरंजीव प्रविण ह्यांच्या स्थळाचा होकार आला. आता लग्न समारंभ करुन देण्याचा प्रश्न आला. व्याळा गावाजवळच हॉटेल मराठाचे संचालक मुरलीधर राऊत हे दरवर्षी अनाथ मुलींचे लग्न समारंभ त्यांच्या वतीने करुन देतात. तेथेच हा विवाह सोहळा करण्याचे ठरले. समारंभपूर्वक लग्न पार पडले.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले कन्यादान...
पालकमंत्री बच्चू कडू यांनी कन्यादानाची जबाबदारी घेतली. त्यानुसार पालकमंत्री आले. वधुपित्याच्या आत्मियतेने सहभागी झाले. पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे विधीवत पूजा करुन जावई प्रविण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन करुन दुर्गा ही कन्या जावई प्रविण ह्यांच्या सुपूर्द केली. विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. सर्व उपस्थितांनी वधू-वराला शुभाशिर्वाद दिला.
"मुरलीधर राऊत यांचे हे कार्य आम्ही कधीच विसरणार नाही.."
छत्र हरवलेल्या मुलींना कुठलाही आधार नसताना मराठा हॉटेलचे संचालकांनी पूर्ण केलेला संकल्प आम्हाला आपलेपणाची जाणीव करुन देणारा आहे. मुरलीधर राऊत यांचे हे कार्य आम्ही कधीच विसरणार नाही, अशी भावना या वेळी कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola News, Farmer, Marriage