अहमदनगर, 29 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्स संपला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजप उघड पाठिंबा देणार नसला तरी स्थानिक पातळीवर तांबे यांचच काम करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. "सत्यजित तांबे मला भेटले असून माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करतात आणि सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला, असं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे मला भेटले, माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करतात. यावेळी सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला असल्याचे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपने जरी सत्यजित तांबे यांना पाठींबा दिला नसला आणि स्थानिक पातळीवर निर्णय होईल, असं सांगितलं असलं तरी सत्यजित तांबे आपल्याला भेटले का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना मंत्री विखे पाटील यांनी हे उत्तर दिलं आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
वाचा - अजितदादा व्यासपीठावर आले, ती वस्तू पाहून भडकले, कार्यकर्ते घाबरले, Video
चंद्रशेखर बावनकुळे यांचेही स्पष्ट संकेत
नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही ती एकालाच मिळेल. त्यामुळे भाजपची मत निर्णायक ठरतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्युज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे स्पष्ट संकेत आता भाजपकडून मिळाले आहेत. या संदर्भात स्थानिक नेते हे बैठक घेऊन कोणत्या अपक्षाला मतदान करायचा याचा निर्णय घेईल, आम्ही अपक्षाला मतदान करणार असा निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून घेतला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना मतदान करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
पाठिंबा मागितला नाही : सत्यजित तांबे
आम्ही भाजपकडे पाठिंबा मागितला नाही किंवा तेही आमच्याकडे आले नाही. मात्र, आमचे पूर्वीपासून सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत. आम्ही काम करताना कधीही पक्ष पाहून केले नाहीत. त्यामुळे पाचही जिल्ह्यात तांबे कुटुंबावर प्रेम करणारी लोक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातून पाठिंबा मिळत असल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.