अहमदनगर, 26 मे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिर्डी ते भरवीर या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण झालं आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांचे आगमन थेट हेलिकॉप्टर मधून समृद्धी महामार्गावर आगमन झाले. महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर आता सहा तासांत पूर्ण करता येणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. काल परवा सुप्रीम कोर्टाने सरकारचा मार्ग मोकळा केला. तसा आम्ही समृध्दी महामार्ग मोकळा केला. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. घरात बसून चर्चा करत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना चिमटा काढला आहे. पुढे ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं. त्यांनी खूप मेहनत घेतली. पंतप्रधानांनी सगळे अडथळे दूर केले म्हणून 600 किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो. हा शेतकऱ्यांचं भविष्य घडणारा रस्ता आहे. आम्ही चार तासात पोहोचलो. तुम्ही पाच तास घ्या पण सुरक्षेची काळजी घ्या असे आवाहन करत भविष्यात असेच प्रकल्प करायचे आहेत, हे सर्वसामान्य जनतेच सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
वाचा - 'माकडाच्या हातात..' ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाकडून नवीन चित्रपटाची घोषणा
राम शिंदे आणि विखे पाटील यांचे सोबत आगमन
गेल्या काही दिवसापासून एकमेकांवर आरोप करणारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमधून एकत्रित प्रवास केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिपॅडवर उतल्यानंतर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि आपल्या छोट्या मुलीला कडेवर घेऊन आलेल्या शेतकऱ्याच्या मुलीबरोबर फोटो काढण्यासही वेळ दिला.
शिर्डी ते भरवीर अंतर 40 मिनिटात पूर्ण होणार
शिर्डी येथे आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले. याआधी डिसेंबर 2022 मध्ये नागूपर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. हा पहिला टप्पा 501 किमीचा आहे. आता, शिर्डी ते भरवीर हा 80 किमीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या 40 ते 45 मिनिटात पार करता येणार आहे. शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.