अहमदनगर, 01 नोव्हेंबर : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या शिरकावानं मानवी जीवन विसकळीत केलं. यानंतर आता जनावरांमध्ये पसरणारा घातक लम्पी नावाच्या रोगाची साथ आली आहे. संसर्गजन्य रोगाचा शिरकाव मोठ्या झपाट्यानं पसरत आहे. या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर गुरे दगावली देखील आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लम्पीचा प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर एका तरुणानं देशातील पहिले क्वारंटाईन सेंटर उभारले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक 23 वर्षीय तरुण शेतकऱ्यांसाठी धावून आला आहे. जनावरांमधील लम्पी संसर्जजन्य रोग पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात कॉम्प्युटर इंजिनियर असणारा तरुण शरद मरकडने पशुधनासाठी क्वारंटाईन सेंटर उभारलं आहे. लोकसहभागातून उभारलेलं हे क्वारंटाईन सेंटर देशातील पहिलं असल्याचं शरद सांगतो. सेंटरच्या निर्मितीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता येथे जवळपास 100 जनावरे लम्पी आजारावर उपचार घेत आहेत. जनावरांसाठी वरदान इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर नोकरी व्यवसाय न करता थेट शेतीकडे वळणारा शरद हा आज सर्व युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 2019 ला विनाअनुदानित पहिली चारा छावणी शरदनेच सुरू केली. आई-वडील शेतकरी असल्यामुळे अगदी लहानपणापासून शेती बद्दलची ओढ आहे. लम्पी व्हायरसचा जिल्ह्यात शिरकाव झाला आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. जनावरांना आजाराची लागण झाली तर योग्य उपचार न मिळाल्यास पशुधन दगावू शकतात. त्यामुळे लम्पीग्रस्त जनावरांसाठी सर्व सुविधा युक्त लम्पी क्वारंटाईन सेंटर शरदने सुरू केलं. हे सेंटर जनावरांसाठी वरदान आहे. Success Story : दहावीतच दृष्टी गेली पण हार मानली नाही, जिद्दीनं मिळवली सरकारी नोकरी! दोन रुग्णवाहिकेची गरज क्वारंटाईन सेंटरमध्ये आयसीयू वॉर्ड, जनरल वॉर्ड आहेत. आतापर्यंत जवळपास 70 हून अधिक जनावरे बरे झाले आहेत. तर शंभरच्या जवळपास जनावरे या क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या उपचार घेत आहेत. या सर्व जनावरांचा दिवसाला 14 ते 15 हजार इतका खर्च येतो. हा सर्व खर्च कधी स्वतःच्या स्वखर्चातून तर कधी दानशूर व्यक्तींच्या देणगीतून केला जातो. 8 लोकांचा स्टाफ काम करत आहे. तर शासकीय जनावरांचे डॉक्टर हे देखील या ठिकाणी कार्यरत आहेत. जनावरांना ने -आन करण्यासाठी एक ॲम्बुलन्स आहे. मात्र, आणखी दोन ॲम्बुलन्सची गरज आहे. तसेच जनावरे वाढत असल्यानं मदतीचीही गरज आहे. या सेंटरमधली सर्व सेवा मोफत आहे. आजारी जनावरे आणणे, बरे करणे आणि पुन्हा शेतकऱ्याकडे नेहून सोडली जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.