मुंबई, 6 फेब्रुवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झाल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेस हायकमांड नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
'जे राजकारण झालं ते व्यथित करणारं आहे, याबाबतच्या भावना मी काँग्रेस श्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे बाहेर बोललं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षपातळीवर आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ,' असा इशाराच बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
दुसरीकडे आमच्यामध्ये एकोपा असून कोणताही वाद नसल्याचा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर या प्रकारच्या वावड्या उठवून भाजप बातम्या पेरत आहे, जनतेच्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचा हा ठरवून केलेला प्रयत्न आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमात बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली.
'सत्यजीत तांबे चांगल्या मताने विजयी झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जे राजकारण झालं ते व्यथित करणारे आहे, ही वस्तूस्थिती आहे. माझ्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, कुठे बाहेर बोललं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षपातळीवर आणि माझ्या पातळीवर आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत,' असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
'काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. विधानपरिषदेच्या राजकारणात आपल्याला भाजपमध्ये नेऊन पोहोचवलं. भाजपच्या तिकीटाचं वाटपसुद्धा करून टाकलं. काही लोक गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आपली पुढील वाटचाल त्याच विचाराने होणार आहे,' असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
याआधी सत्यजीत तांबे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरच खळबळजनक आरोप केले. नाना पटोले यांच्याकडून नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. थोरात-तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं गेलं आणि त्याची स्क्रीप्ट लिहिली गेली, असे आरोप सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Congress, Nana Patole