अहमदनगर, 10 जानेवारी : 2019 च्या निवडणुकांआधी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. मुलगा सुजय विखे पाटील यांच्यासाठी लोकसभेची जागा सोडायला शरद पवारांनी नकार दिला आणि विखे भाजपवासी झाले, यानंतर भाजपच्या तिकीटावर सुजय विखे पाटील खासदार आणि राधाकृष्ण विखे पाटील आमदार झाले, पण चारच वर्षांमध्ये भाजपनेच विखे पाटील यांची त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या अहमदनगरमध्ये राजकीय कोंडी केली आहे.
राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे अहमदनगरचं विभाजन झालं पाहिजे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मोठा जिल्हा आणि 14 आमदारांमुळे राज्यातील राजकारणामध्ये अहमदनगरचा दबदबा कायम राहिला आहे. जिल्ह्याचं विभाजन झाल्यास राज्यातील राजकारणात जिल्ह्याचा दबदबा कमी होईल, असाही सूर पाहायला मिळतो.
दक्षिण नगर आणि उत्तर नगरचा विचार केला तर उत्तर नगरमधल्या नेत्यांचा राज्याच्या राजकारणात अधिक दबदबा राहिला आहे. त्या तुलनेत दक्षिणेकडील नेत्यांवर अन्याय होत असल्याचाही सूर पाहायला मिळतो, त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी विभाजनाचा मुद्दा लावून धरला आहे.
राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विभाजनासाठी तयार असले तरीही भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विभाजनाला विरोध केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीत माध्यमांशी बोलताना विभाजनाला विरोध दर्शवला होता. दुसरीकडे भाजपचेच आमदार राम शिंदे यांनी मात्र विभाजनाची मागणी लावून धरली त्यामुळे भाजपमध्ये या मुद्द्यांवरून दुफळी पाहायला मिळत आहे.
भाजपमध्येच या मुद्द्यावरून दुफळी दिसत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नामांतर आणि विभाजनाच्या मुद्द्यावर सर्वसामान्य नगरकरांचं मतही जाणून घेतलं पाहिजे, असाही एक सूर आहे. हे मुद्दे उपस्थित करून भाजप सामान्यांच्या प्रश्नावरून जनतेचं लक्ष विचलित करत असल्याचाही आरोप होत आहे.
जिल्हा विभाजनाने प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा जरी येणार असला तरी दक्षिण नगरमधून शिर्डी तुटलं जाणार आहे. त्यातच उत्तर नगर हा सुजलाम सुफलाम आहे पण दक्षिण नगर जिरायत भाग आहे. फक्त दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांना राज्याच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी हा मुद्दा समोर येत आहे का? हा देखील चर्चेचा विषय बनला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विखे कुटुंबियांनी एकप्रकारे भाजप ताब्यात घेतल्याचं चित्र आहे, त्यामुळेच भाजप आमदार राम शिंदे यांनी हा मुद्दा पुढे आणल्याचं बोललं जात आहे. आधी गोपीचंद पडळकरांनी नगरच्या नामांतराचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला, यानंतर राम शिंदे यांनी नगरच्या विभाजनाची मागणी केली, त्यामुळे हा फक्त योगायोग समजायचा का? या मुद्द्यांमुळे विखेंची राजकीय कोंडी होणार का? हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.