मुंबई, 17 मार्च : अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला नोव्हेंबर महिन्यात आग (Ahmednagar hospital fire) लागली होती. या अग्नितांडवात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारने कारवाई करत तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन केलं होतं. मात्र, आज सकाळी वृत्त आलं की, राज्य सरकारचा तो आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी रद्द केला आणि डॉ. सुनील पोखरणा यांना पुन्हा नियुक्ती दिली. हे वृत्त प्रसारित होताच आता राजभवनाकडून एक महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. काय आहे राजभवानाचे स्पष्टीकरण? अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः निराधार व कल्पित असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. वाचा : गोवा जिंकल्यानंतर फडणवीस नागपुरात,महाराष्ट्रातील राजकारणाबाबत वर्तवलं मोठं भाकित त्यानंतर डॉ सुनील पोखरणा यांनी दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींना अनुसरून राज्यपाल महोदयांकडे दाद मागितली होती. या संदर्भात मा. राज्यपाल महोदयांनी दिनांक 16 मार्च 2022 रोजी राजभवन येथे सुनावणी ठेवली होती. तसेच या सुनावणीसाठी अर्जदार डॉ सुनील पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ सुनील पोखरणा यांचे निलंबन दिनांक 15 मार्च 2022 रोजीच रद्द केले असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरूर, जिल्हा पुणे या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले. त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या आदेशावरून डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.