अहमदनगर, 13 एप्रिल : नेवासा शहरातील एका व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे आता नगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 28 वर पोहचली आहे. नेवासा शहरात राहणारा पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण सारी आजाराने त्रस्त होता. त्यातच त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सारीचे 15 रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 27 आहे. यातील तिघे कोरोनामुक्त झाले असून श्रीरामपूरच्या एकाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. उर्वरित नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून यातील दोघांवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहे.
नेवासा तालुक्यात यापूर्वी पहिल्या टप्प्यात एकाला कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, 14 दिवसांच्या उपचारानंतर त्याने कोरोनावर मात केल्याने त्याला घरी सोडण्यात आले होते. सध्या हा कोरोनामुक्त होम क्वारन्टाइन आहे.
हेही वाचा- लॉकडाउनमध्ये 'उडता पुणे', गांजा आणण्यासाठी तरुणांनी 'जे' केलं ते ऐकून पोलीसही हादरले!
दरम्यान, आज महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात एकूण संख्याही तब्बल 2064 वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 82 नवे रुग्ण आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. एकटा मुंबईत 82 पैकी 59 रुग्ण आढळले आहे. यात धारावी, कोळीवाडा परिसराचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मालेगावमध्येही 12 रुग्ण आढळले आहे. मालेगावमध्ये गेल्या 48 तासांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
संपादन - अक्षय शितोळे