बारामती, 1 मे : बारामती शहरात कोरोना हद्दपार झाला आहे. शहरात प्रथम एका रिक्षाचालकाचा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती पॅटर्न राबविला. बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील 73 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांला काल त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्याच्यावर पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. बारामती शहरात श्रीरामनगर,समर्थनगर, म्हाडा वसाहत परिसरात आजपर्यंत एकूण सात रुग्ण सापडले होते. यापैकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 16 एप्रिल रोजी श्रीरामनगर येथील रिक्षा व्यवसायिक असणारा रुग्ण कोरोनामुक्त झाला. तसंच 23 एप्रिल रोजी भाजी विक्रेत्याच्या एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यापाठोपाठ शहरातील सातवा आणि शेवटचा रुग्ण असणाऱ्या 73 वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना काल डिस्चार्ज देण्यात आला. या सर्वांवर पुणे शहरात उपचार सुरू होते. आज शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
'कोरोनामुक्त बारामती'चं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं.अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी 'लॉकडाऊन'चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 30, 2020
काय होता बारामती पॅटर्न? बारामती शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या परिसरातील 44 वार्डामधील 44 नगरसेवक 44 झोनल ऑफिसर व 44 पोलीस कर्मचारी मिळून प्रत्येक वार्डातील दहा ते वीस स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक सुविधा घरपोच पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासली नाही. ज्या कुटुंबीयांना अत्यावश्यक बाबीची गरज भासेल त्या नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवा करता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेतला गेला. नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तू मिळाल्या. त्यात भाजीपाला, औषधे यांपासून ते थेट चिकण-मटण यांचाही समावेश होता. यामुळे कोरोनाचा संसर्ग शहरातून मुळापासून नष्ट करण्यास मदत झाली. संपादन - अक्षय शितोळे