बुलडाणा, 06 नोव्हेंबर : महाप्रभोधन यात्रेच्या निमीत्ताने युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. मागच्या काही दिवसांपासून ते नाशिक, जळगाव, बुलडाण्यासह विदर्भ दौऱ्यावर आहेत. या यात्रेच्या निमीत्ताने आदित्य ठाकरे विविध ठिकाणी सभा घेत आहेत. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्या सभांची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जळगाव, सिल्लोड येथील सभा नाकारण्यात आल्यानंतर आता बुलडाण्यातील ही सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाही. यामुळे आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात संवाद साधणार आहेत.
आदित्य ठाकरे यांची बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा आणि मेहकर या 2 ठिकाणी सभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बुलडाणा येथील गांधी भवन येथे होणारी सभा पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत सभेची परवानगी नाकारली होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांची बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सभा होणार आहे. परंतु बुलडाणा येथील मढमध्ये शेताच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता बुलडाणा येथील सभेची परवानगी पोलिसांनी जरी नाकारली असली तरी शेतीच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे संवाद साधणार आहेत.
हे ही वाचा : दुसऱ्या फेरीतही आवाज शिवसेनेचाच, पण ‘नोटा’चा आकडा वाढला
नाशिक सिल्लोडमध्येही तीच अवस्था
माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली असून आता आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी बांधावर ते संवाद साधणार आहेत.
सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर आदित्य ठाकरे ठाकरे जाणार आहेत. सभेऐवजी आता शेतकरी बांधावर संवादाला आदित्य ठाकरेंनी प्राधान्य दिले आहे. यासंबंधीच्या सूचनाही सेना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी याबाबतची माहिती दिली.
हे ही वाचा : शिवसेनेचा आरोप खरा ठरला, चौथ्या फेरीत आकडे वाढले, आतापर्यंतचा संपूर्ण निकाल
सरकारवर आरोप -
राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र घटनाबाह्य सरकारने काहीच केले नाही, असा आरोप गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला होता. केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे त्यांचेच सरकार असताना राज्यातील एक इंजिन फेल गेल्यामुळे गुंतवणुकदार नाराज आहे. या एकाच व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला.