पुणे, 06 ऑगस्ट: सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (adar poonawalla) यांनी एक ट्विट (Tweet) करुन एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोविशील्ड ( Covishield) लसीचं (corona Vaccine) उत्पादन करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं एक मोठी घोषणा केली आहे. कोविशील्ड लस घेऊन परदेशात अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनिवार्य क्वारंटाईनसाठी 10 कोटींचा निधी सीरम इन्स्टिट्यूट देणार आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, परदेशी जाणाऱ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, कोविशील्डची लस घेतलेल्यांना काही देशांमध्ये अद्याप थेट प्रवेश मिळत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाईन अनिवार्य आहे. या परिस्थितीत तुम्हाला काही खर्च येण्याची शक्यता आहे. यासाठी मी 10 कोटींचा निधी ठेवला आहे. तुम्हाला गरज असल्यास कृपया अर्ज करा.
याआधी ब्रिटननं भारत देशाचा समावेश रेड लिस्टमध्ये केला. मात्र त्यानंतर आता भारताला अँबर लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये गेलेल्यांना 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागतं. ज्यावेळी भारत देश रेड लिस्टमध्ये होता त्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अनिवार्य होतं. मात्र अँबर लिस्टमध्ये समावेश होत असल्यानं आता घरी किंवा इतर अन्य ठिकाणी क्वारंटाईन राहण्याची मुभा आहे. येत्या 8 ऑगस्टपासून भारताचा समावेश अँबर लिस्टमध्ये होणार आहे.