धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 7 जून : हेल्थ कॉन्शियस हा शब्द हल्ली सगळ्यांच्या तोंडी सर्रास ऐकायला मिळतो. त्यामुळे डाएट हे सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. ‘डाएट’ची योग्य व्याख्या सांगायची तर ती म्हणजे संतुलित असा आहार. आहाराच्या या पॅटर्नप्रमाणे नात्यांचं योग्य संतुलन राखणाऱ्या ‘Diet लग्न’ या नव्या पॅटर्नबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. रिलेशनशिप बॅलन्स करण्यासाठी हे डाएट लग्न एक उत्तम पर्याय असू शकतो का? या विषयावर ‘डाएट लग्न’ हे नवं नाटक रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालंय. ‘रिलेशनशिप बॅलन्स करणारं क्रिस्पी नाटक’ अशी टॅगलाईन असलेल्या या नाटकाचं लेखन मनस्विनी लता रवींद्र यांनी केलंय. विजय केंकरे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घरोघरी पोहचलेली शनाया म्हणजेच रसिका सुनील आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे.
काय आहे विषय? रसिकानं या नाटकाबद्दल लोकल18 ला विशेष माहिती दिली. ‘मी या नाटकात हृताची भूमिका साकारत आहे. नवऱ्यावर प्रचंड प्रेम करणारी, गोड, प्रश्न पडलेली अशी ही मुलगी आहे. ‘लग्न का करायचं? लग्न केल्यावर डाएट का करायचं असतं? या सारख्या गमतीशीर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नाटकातून मिळतील,’ असं रसिकानं सांगितलं. अभिनेता सिद्धार्थ बोडके या नाटकात अलोक ही भूमिका साकारत आहे. ‘अलोक प्रोफेशनल शेफ आहे. त्याचं हृतावर फार प्रेम आहे. नात्यांमध्ये काही गोष्टी राहून जातात त्याच या नाटकात मांडण्याचा प्रयत्न केलाय,’ असं सिद्धार्थनं यावेळी बोलताना सांगितलं. ‘पहाटे 4.30 वाजेपर्यंत व्हिडीओ कॉलवर बोलायचे’; दत्तू मोरेची हटके लव्हस्टोरी रसिका सुनील, सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आर पी या त्रिकुटाच्या ‘Diet लग्न’ च्या शुभारंभाचे प्रयोग शुक्रवार 9 जून रोजी दुपारी 4 वाजता श्री शिवाजी मंदिर दादरमध्ये होणार आहे. तर दुसरा प्रयोग शनिवार 10 जून रोजी दुपारी 4.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवलीमध्ये होईल.