पुणे, 27 एप्रिल : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. तसंच कोरोनाची लागण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आङे. पुण्यातील झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या भागात कोरोनाने प्रवेश केल्यानेच रुग्णसंख्या वाढू लागल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेने एक विशेष मोहिम सुरू केली आहे.
'पुणे शहरात गेल्या 10-15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना इतर विकार आहेत ते व्यक्ती कोरोनाबाधित होऊन हा रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत होता. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत पुढाकार घेऊन झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आपण 350 टीम पाठवत आहोत,' अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
'या टीमजवळ विविध संसाधने असतील. त्या भागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे जे आजार आहेत ते नियंत्रणाखाली आहेत की नाही हे तपासायचे आणि त्यांना जर कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यांना वेगळं काढून त्यांच्यावर उपचार सुरू करायचे. सर्व नारिकांनी पुढे येऊन कोणाला लक्षण दिसत असतील तर कृपया याबाबत माहिती द्या. हे लपवू नका. आपलं सहकार्यच आम्हाला या रोगावर मात करण्यास मदत करू शकेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा रोग जीवघेणा ठरत आहे, त्यामुळे नागरिकांनी कृपया पुढे या आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.
भवानी पेठ, कासेवाडी, ताडीवाला रोड, पाटील इस्टेट या भागातच का वाढतोय संसर्ग?
सर्वाधिक रूग्णसंख्या असलेली पुणे शहरातील ही प्रमुख ठिकाणं एकतर दाटलोकवस्ती किंवा झोपडपट्टीचा भाग आहेत. केवळ सीलबंद लॉकडाऊन करून तिथं सोशल डिस्टंट पाळणं केवळ अशक्य प्राय गोष्ट आहे. म्हणूनच आतातरी जिल्हा साथरोग आपत्ती व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनानं या कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या झोपडपट्टी भागातील लोकांना मोकळ्या शाळा, हॉल्स, मैदानांमध्ये हलवण्याची सूचना पुणे पोलिसांनी केल्याचं कळतंय.
कारण दाटवस्ती भागातील लोकांना लॉकडाऊन करून ठेवल्यानं फैलाव कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालला आहे. कारण याभागात लोकांना कॉमन टॉयलेट- बाथरूम वापरावी लागतात. अरूंद गल्ल्या, बैठी पऱ्याची घरं...अशातच 10 बाय 10 च्या खोल्यांमधून किमान पाच-सहा माणसं राहत असल्याने घरातील एकाला संसर्ग झाला की तो किमान सहा ते सात जणांना संसर्गित करत असल्याचं आढळून आलं आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus